नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : अमेरिकन डॉलरचे (US Dollar) मुल्य घसरल्यामुळे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव वाढले आहेत. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या दरावर झाला आहे. गुरुवारी दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत (Gold Price Today) प्रति तोळा 287 रुपयांनी वाढली आहे. त्याचप्रमाणे चांदीचे दर देखील प्रति किलो 875 रुपयांनी वधारले आहेत. मात्र तज्ज्ञांच्या मते ही वाढ दीर्घकालीन नाही आहे. त्यांच्या मते सध्याच्या परिस्थितीनुसार सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री होऊ शकते. कॉमेक्सवर सोन्याचे दर 1900 डॉलर प्रति तोळापेक्षाही खाली येऊ शकतात. त्यामुळे भारतीय बाजारात देखील घसरण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सोन्याचे नवे दर (Gold Price on 10th September 2020)
दिल्लीतील सराफा बाजारात आज सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. सलग चौथ्या दिवशी ही वाढ पाहायला मिळाली. 99.9 टक्के शुद्धता अर्थात 24 कॅरेट सोन्याची किंमत आज प्रति तोळा 52,104 रुपयांवरून वाढून 52,391 रुपयांवर पोहोचली आहे. या दरम्यान 287 रुपये प्रति तोळाने वाढ झाली आहे.
चांदीचे नवे दर (Silver Price on 10th September 2020)
चांदीच्या किंमतीत देखील सलग चौथ्या दिवशी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. गुरुवारी दिल्लीतील सराफा बाजारात एक किलोग्रॅम चांदीची किंमत 69,075 रुपये प्रति किलोवरून 69,950 रुपये प्रति किलो झाली आहे. या दरम्यान चांदीच्या दरात 875 रुपयांची वाढ झाली आहे.
(हे वाचा-200 अब्ज डॉलर मार्केट कॅप गाठणारी रिलायन्स पहिली कंपनी, शेअर रेकॉर्ड नवीन उंचीवर)
(हे वाचा-नोकरी गेल्यानंतरही तुमच्या पीएफ खात्यामार्फत होईल कमाई, वाचा नियम व अटी)
आज आधीच्या सत्रात एमसीएक्सवर सोन्याची वायदा किंमत 0.07 टक्क्यांनी वाढली होती तर चांदीची वायदा किंमत 0.12 टक्क्यांनी कमी झाली होती. सोन्याच्या दरामध्ये गेल्या महिन्यातील दरापेक्षा साधारण 5000 रुपयांची घसरण दिसून येत आहे. गेल्या महिन्यात सोने जवळपास 56,200 रुपये प्रति तोळा या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. अशाप्रकारे चांदी देखील जवळपास 10 हजार रुपयांनी कमी झाली आहे. कोरोना व्हायरस काळात सोन्याचांदीच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळत आहे.