नवी दिल्ली, 03 मार्च: सध्या लग्नसराईची धुमधाम सुरू आहे. यावर्षी जानेवारीपासून सोन्याचे दर (24 कॅरेट) 4,963 रुपयांनी (9.89 टक्के) कमी झाले आहेत. भारतामध्ये सोन्याचे दर आज 10 महिन्यातील सर्वात कमी स्तरावर आहेत. आज एमसीएक्सवर सोन्याची वायदे किंमत (Gold Future) 0.11 % ने घसरून 45,500 प्रति तोळावर ट्रेड करत आहेत. गेल्या सात दिवसातील सहाव्यांदा घसरण झाली आहे. चांदीची वायदे किंमत (Silver Future) 69,216 प्रति किलोग्रामवर स्थीर आहे. गेल्या दहा महिन्यात सोन्याचे दर तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते.
सोन्याचे नवे दर
वायदे बाजारात बुधवारी सोन्याचे दर 45,500 रुपये प्रति तोळा झाले आहेत. मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 44,760 रुपये प्रति तोळा होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) सोन्याचे दर 0.2 टक्क्याने घसरून 1,734.16 डॉलर प्रति औंस झाले आहेत.
चांदीचे नवे दर
वायदे बाजारात बुधवारी चांदीचे दर स्थीर आहेत. चांदीचे दर 69,216 प्रति किलोग्राम आहेत. दरम्यान मंगळवारी चांदीच्या दरात 1,847 रुपयांची घसरण झाली होती. यानंतर चांदीचे दर 67,073 रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदी 0.3% ने घसरून 26.67 डॉलर प्रति औंस झाली आहे.
(हे वाचा-तापसी पन्नू, अनुराग कश्यप इनकम टॅक्स विभागाच्या रडावर; मुंबईत विविध ठिकाणी छापा)
इंटरनॅशनल अँड कमोडिटी अॅट कॅपिटल अॅडव्हायजर क्षितीज पुरोहित यांनी अशी माहिती दिली आहे की, सोन्याचे दर आता साइडवे ट्रेड करत आहेत. सोन्याच्या दरात सध्या मोठा बदल पाहायला मिळणार नाही. एमसीएक्स गोल्ड 45600-45800 या स्तरावर राहू शकते. तर केडिया अॅडव्हायजरीचे एमडी अजय केडिया यांनी अशी माहिती दिली आहे की, सोन्याला 44,500-45000 रुपयांदरम्यान सपोर्ट मिळेल. अर्थात सोन्याचे दर 45 हजारांपेक्षा कमी होण्याची शक्यता कमी आहे. केडिया यांच्या मते शॉर्ट टर्ममध्ये सोन्याचे दर एवढेच राहतील किंवा यापेक्षा जास्त होतील.
सोनेखरेदीची चांगली संधी
देशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. लग्नाचा हंगाम सुरू आहे आणि सोन्याचे दरही उतरले आहेत. अशावेळी मागणीचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या कमी झालेल्या किंमती अगदी थोड्या कालावधीसाठी असू शकतात. सोन्याचे दर पुन्हा उसळी घेतील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोनेखरेदीसाठी आता चांगली संधी आहे.