नवी दिल्ली: जागतिक बँकिंग संकटाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. सिलिकॉन व्हॅली बँक आणि त्यापाठोपाठ क्रेडिट सुईस बँकही संकटात सापडली आहे. यामुळे बँकिंग क्षेत्रावरच्या संकटाचा परिणाम आता इतरही देशांमध्ये जाणवू लागला आहे. अमेरिका आणि युरोपीय देशांमधल्या बँका आर्थिक संकटात सापडल्याचा परिणाम भारतीय आयटी कंपन्यांवर होत आहे.
भारतीय आयटी कंपन्यांचं मोठं मार्केट अमेरिका हे आहे. आयटी कंपन्या जगातल्या मोठ्या बँका आणि वित्तीय संस्थांना त्यांच्या सेवा देतात. त्यामुळे या बँकांवर आर्थिक संकट कोसळलं, तर आयटी कंपन्यांना त्यांच्याकडून नवं काम मिळणार नाही व असलेल्या कामाचे दरही कमी होतील. याचा परिणाम आयटी कंपन्यांच्या अर्थव्यवहारावर होईल, हीच भीती सध्या शेअर मार्केटमध्ये जाणवते आहे. गेल्या 6 ट्रेडिंग सत्रांमध्ये निफ्टी आयटी इंडेक्स साडेपाच टक्क्यांनी घसरला आहे.
भारतातील या 3 बँका सर्वात जास्त सुरक्षित, कधीच बुडणार नाहीत पैसे
बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स (BFSI) यातल्या सेवा भारतीय आयटी कंपन्यांचा मोठा भाग आहेत. त्यामुळे जागतिक बँकिंग संकटाचा थेट फटका याला बसेल. स्टेकबाबत बोलायचं झालं, तर टीसीएसच्या एकूण उत्पन्नापैकी जवळपास 32 टक्के, इन्फोसिसमधलं 29 टक्के, विप्रोतलं 35 टक्के, एचसीएल टेकचं 20 टक्के, टेक महिंद्राचं 16 टक्के उत्पन्न BFSI मधून येतं.
हे मोठ्या कंपन्यांबाबत झालं; मात्र लहान किंवा मध्यम कंपन्यांबाबतही हेच दिसून येतं. LTIMindtree कंपनीचं 37 टक्के, एम्फसिसचं 54 टक्के एल अँड टी टेकचं 36 टक्के, पर्सिस्टंटचं 33 टक्के, कोफोर्जचं 53 टक्के उत्पन्न BFSIमधून येतं.
ब्रोकरेज कंपनी जेपी मॉर्गनच्या मते, टीसीएस आणि इन्फोसिस या भारतीय आयटी कंपन्यांची अमेरिकेतल्या स्थानिक बँकांमध्ये गुंतवणूक जास्त आहे. दोन्ही कंपन्यांच्या एकूण उत्पन्नापैकी 2-3 टक्के वाटा स्थानिक बँकांमधून येतो. चौथ्या तिमाहीच्या निकालात कंपन्या परिस्थिती स्पष्ट करतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 12 एप्रिलपासून चौथ्या तिमाहीचे निकाल समोर येतील.
बँका बुडण्याचं प्रमाण वाढतंय तुमच्या कष्टाचे पैसे बँकेत किती सुरक्षित?
अमेरिकेपाठोपाठ युरोपातल्या बँका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचल्या आहेत. आता हेच लोण जगभर पसरेल का याची चिंता तज्ज्ञांना वाटत आहे. अर्थात भारतीय बँकिंग व्यवस्थेला याने अजून तरी धोका नाही, असं तज्ज्ञांना वाटत आहे; मात्र जागतिक बँकांमधल्या संकटामुळे भारतातल्या अनेक क्षेत्रांना फटका बसू शकतो. आयटी हे त्यापैकीच एक क्षेत्र आहे. आयटी कंपन्यांच्या उत्पन्नातला मोठा वाटा बँकिंग क्षेत्राकडून येतो. त्यामुळे भारतीय आयटी कंपन्यांवर त्याचा काय परिणाम होतोय, हे लवकरच कळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money