नवी दिल्ली, 2 डिसेंबर : घरात छोटी मुलगी असेल तर तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी म्हणजे तिचं शिक्षण व लग्नासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद नियोजनबद्ध पद्धतीने करावी लागते. केवळ मुलगीच नव्हे, तर मुलग्याच्या भविष्यासाठीही पैशांची तरतूद करणं हा महत्त्वाचा विषय असतो. त्यासाठी गुंतवणुकीच्या अनेक योजना उपलब्ध आहेत; मात्र मुलींच्या दृष्टीने असलेली एक योजना खूपच उत्तम आहे. त्या योजनेचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना.
या योजनेत खातं उघडून नियमितपणे गुंतवणूक केल्यास तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी पैशांची चिंता करण्याची गरज नाही. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींच्या नावे सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडता येतं. आपल्या लाडक्या मुलीसाठी या योजनेअंतर्गत दररोज 100 रुपयांची बचत करून 15 लाख रुपये उभारता येऊ शकतात. तसंच दररोज 416 रुपये बचत करून 65 लाख रुपयांचा निधी उभा करता येऊ शकतो. तो तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी कामी येऊ शकेल.
सुकन्या समृद्धी योजना ( SSY) ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक अल्पबचत योजना आहे. ही योजना 'बेटी बचाओ बेटी पढावो' या कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आली आहे. अन्य अल्पबचत योजनांच्या तुलनेत सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर चांगला आहे.
खातं कसं उघडावं?
या योजनेअंतर्गत कोणतीही व्यक्ती आपल्या दोन मुलींसाठी खातं उघडू शकते. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 10 वर्षांखालच्या मुलीच्या नावावर सुरुवातीला 250 रुपये जमा करून खातं उघडता येतं.
खातं कुठे उघडता येतं?
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडता येतं. तसंच अनेक बँकांमध्येही ही योजना उपलब्ध असते. वयाची 21 वर्षं पूर्ण झाल्यावर ती मुलगी आपल्या खात्यातून पैसे काढू शकते.
जाणून घ्या 65 लाख रुपये कसे मिळतील?
या योजनेत महिन्याला 3000 रुपये गुंतवले, तर वर्षाला आपल्याला 36 हजार रुपये होतील. 14 वर्षांनंतर 7.6 टक्के वार्षिक चक्रवाढ व्याजाच्या हिशोबाने 9,11,574 रुपये मिळू शकतील.
हेही वाचा - होम लोन ट्रान्सफर करताना तुम्ही केलीय का ही चूक, वेळीच सुधारा
21 वर्षांनंतर म्हणजे मुदत संपल्यावर ही रक्कम जवळपास 15,22,221 रुपये होईल. म्हणजे दररोज 100 रुपयांची बचत मुलीसाठी या योजनेअंतर्गत केली, तर तिच्या भविष्यासाठी 15 लाख रुपयांचा निधी आरामात उभा करता येऊ शकेल.
दररोज 416 रुपयांची बचत या योजनेअंतर्गत केली, तर 65 लाख रुपयांचा निधी योजनेची मुदत संपेपर्यंत उभा करता येऊ शकेल.
हे खातं कधीपर्यंत चालू राहतं?
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं उघडल्यानंतर मुलीच्या वयाच्या 21व्या वर्षापर्यंत वा 18 वर्षांनंतर तिचं लग्न होईपर्यंत हे खातं चालू राहतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.