नवी दिल्ली, 18 जून : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांची महत्त्वाची पत्रकार परिषद आज दिल्लीमध्ये पार पडली. 20 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गरीब कल्याण योजना लाँच होणार आहे. तत्पूर्वी निर्मला सीतारामन यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. 50,000 कोटींची असणारी ही योजना लॉकडाऊनमध्ये घरी पोहोचलेल्या मजूरांसाठी महत्त्वाची असणार आहे.
लॉकडाऊननंतर गावी पोहोचलेल्या मजूरांसाठी ही योजना 20 तारखेपासून सुरू होणार आहे. त्याबाबत आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन पत्रकार परिषदेतून माहिती देत आहेत. प्रवासी मजुरांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी अर्थमंत्री म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की 'बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा आणि राजस्थान या राज्यांमध्ये सर्वाधिक मजूर परतले आहेत. याठिकाणी 116 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मजूर आले आहेत. त्यांच्याकरता रोजगार या योजनेतून उपलब्ध करता येईल.' दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये अर्थमंत्री भारत चीन संघर्षाबाबत बोलतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
या योजनेअंतर्गत 25 क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जाणार आहेत. ज्यामध्ये ग्राम पंचायत भवन, विहिरींचे बांधकाम, अंगणवाडी, राष्ट्रीय महामार्गांची कामे, हॉर्टिकल्चर यांसारख्या एकूण 25 सेक्टर्सचा समावेश आहे. 125 दिवसांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. 116 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. जल जीवन मिशन, ग्राम सडक योजना यांसारख्या योजनांमध्ये प्रवासी मजूरांना देखील संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या अभियानाअंतर्गत बिहारच्या 32, उत्तर प्रदेशच्या 31, मध्य प्रदेशचे 24, राजस्थानच्या 22 , ओडिशामधील 4, झारखंडच्या 3 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार आहे. बिहारमधून या योजनेचा शुभारंभ होणार आहे. 20 जून रोजी सकाळी 11 वाजता बिहारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही योजना लाँच करणार आहेत. खगड़िया जिल्ह्यातील तेलिहार गावातून ही योजना लाँच होणार आहे.