हैदराबाद: तेलंगणा पोलिसांनी सचिवालयातील वरिष्ठ सहाय्यकाला अटक केली आहे. बनावट मृत्यू दाखवून विम्याचा दावा करण्याचा त्याचा डाव होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती तेलंगणातील मेडक जिल्ह्यातील टेकमल मंडलातील वेंकटपूर गावाच्या हद्दीतील भीमला तांडा येथील मूळ रहिवासी आहे.
त्याचे नाव पथलोथ धर्मा असून तो सचिवालयात वरिष्ठ सहायक म्हणून काम करतो. CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार हैदराबादमधील कुकटपल्ली येथे तो कुटुंबासह वास्तव्यास आहे. ऑनलाइन सट्टेबाजीत त्याचे मोठे नुकसान झाले, त्यासाठी त्याने कर्ज घेतले होते. नियमित उत्पन्नातून मोठं कर्ज फेडणं अशक्य झाल्याने त्याने ते फेडण्यासाठी कट रचला.
कारमध्ये एका व्यक्तीला जिवंत जाळलं
कर्जमुक्त होण्यासाठी त्याने मृत्यूचा बनाव केला. बनावट मृत्यू दाखवून त्याला विम्यामधून मिळणाऱ्या सात कोटी रुपयांतू कर्ज फेडायचं होतं. यासाठी त्याने कारमध्ये स्वतःला जिवंत जाळल्याचा सीन क्रिएट केला आणि आपला हेतू साध्य करण्यासाठी त्याने कारमध्ये दुसऱ्या एका व्यक्तीला जिवंत जाळले. 9 जानेवारीला पोलिसांना वेंकटपूर गावाच्या बाहेर एक पूर्णपणे जळालेली कार सापडली.
या कारमध्ये त्यांना एक मृतदेह आढळला. कारमध्ये धर्माचे कपडे सापडल्यानंतर पथलोथ धर्माची पत्नी नीला हिने हा मृतदेह आपल्या पतीचा असल्याची पुष्टी केली. नीलाच्या जबाबाआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला, मात्र जळालेल्या कारजवळ पेट्रोलचा कॅन सापडल्यानंतर पोलिसांना या प्रकरणाचा संशय आला. त्यांनी धर्माची पत्नी नीला आणि तिच्या नातेवाईकांचे मोबाईल जप्त केले आणि कॉल लिस्ट तपासण्यास सुरुवात केली.
असा झाला खुलासा
यासोबतच पोलिसांनी धर्माच्या भाच्याचा ठावठिकाणाही शोधून काढला. ज्या ठिकाणी गाडी संशयास्पदरित्या जाळली त्याठिकाणी तो अनेकदा फिरत होता. नीलाच्या मोबाईलवर पती धर्माचा मेसेज आल्यानंतर पोलिसांचा तपास सोपा झाला. मेसेजमध्ये धर्माने त्याच्या पत्नीला संबंधित आधिकाऱ्यांकडून मृत्यूचा दाखला घ्यावा आणि 7 कोटींचे विमा संरक्षण मिळाल्यानंतर कर्जाची सर्व थकबाकी भरण्यास सांगितले.
यावरून काहीतरी मोठा कट रचला गेला असून धर्मा अजूनही जिवंत असल्याची पोलिसांची खात्री पटली. मेसेजच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आणि महाराष्ट्रातील पुणे येथून त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी त्याने स्वतःचा बनावट मृत्यू घडवून आणला आणि त्यासाठी त्याने त्याच्या ड्रायव्हरची हत्या करून मृतदेह आपल्या कारमध्ये ठेवला.
कंपन्या करतात दाव्यांची चौकशी
एका अग्रगण्य विमा कंपनीच्या विकास अधिकाऱ्याने `न्यूज 18` शी बोलताना सांगितलं, सामान्यतः विमा कंपन्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या वयाच्या आधारावर आणि त्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या 15 ते 20 पट विमा देतात. धर्माने त्याचा विमा वेगवेगळ्या विमा कंपन्यांमध्ये करून घेतला असावा.
विम्याच्या वेळी कंपन्यांनी जास्त तपास केला नाही तरी त्या दाव्यांची तपशीलवार तपासणी नक्कीच करतात. कदाचित ही गोष्ट धर्माला माहिती नसावी. मेडकच्या एसपी रोहिणी प्रियदर्शिनी यांनी धर्माच्या अटकेला दुजोरा दिला असून, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Insurance