नवी दिल्ली, 16 एप्रिल : देशातील कोट्यवधी पेन्शनधारकांना (Pensioner) EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं मोठा दिलासा दिला आहे. पेन्शनधारकांना लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करण्याच्या अटीत मोठी सवलत दिली आहे. आता पेन्शनधारक लाईफ सर्टिफिकेट कधीही (Life Certificate can give anytime) सादर करू शकतात.
यापूर्वी फक्त नोव्हेंबर महिन्यातच लाईफ सर्टिफिकेट सादर करण बंधनकारक होतं. त्यामुळे पेन्शनधारकांना मोठी धावपळ करावी लागायची. पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिक असल्याने त्याच ठरावीक काळात जीवन प्रमाणपत्र सादर करणं अनेकदा शक्य होत नसे. अर्थातच, याचा परिणाम पेन्शनवर होण्याची भीती होती. आता मात्र हा निर्णय घेतल्यानं कोट्यवधी पेन्शनधारकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
दर वर्षातून एकदा जिवंत असल्याचा पुरावा म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट बँकेत सादर करणं पेन्शनरांसाठी अत्यावश्यक असतं. पेन्शन मिळण्यात कोणताही अडथळा येऊ नये किंवा पेन्शन थांबू नये यासाठी हे प्रमाणपत्र सादर करावं लागतं. आता हे प्रमाणपत्र वर्षातून कधीही सादर केलं तरी चालणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हे प्रमाणपत्र एक वर्षासाठी वैध असेल. ईपीएफओनं ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. EPS-95 चे पेन्शनधारक आता कोणत्याही वेळेस जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतील. याची वैधता एक वर्ष असेल, असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
याचाच अर्थ आता फक्त नोव्हेंबर महिन्यातच लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याच्या कटकटीतून पेन्शनधारकांची सुटका होणार आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात किंवा अन्य ठिकाणी असतील किंवा सोबत कुणी नसेल तर त्यांना या ठरावीक काळात प्रमाणपत्र सादर करणं अवघड जात असे.
पेन्शनधारक त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन हे प्रमाणपत्र जमा करू शकतात. त्याशिवाय बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्येही हे प्रमाणपत्र सादर केलं जाऊ शकतं. त्याशिवाय ज्या पेन्शनधारकांना घराबाहेर पडणं शक्य नसेल किंवा काही आजार असल्यामुळे बँक किंवा पोस्ट ऑफिसपर्यंत पोहोचणं शक्य नसेल त्यांना घरबसल्या हे प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा आहे.
पेन्शन आणि पेन्शन कल्याण विभागाच्या माहितीनुसार 12 सरकारी बँकांच्या डोअरस्टेप अलायन्स (बँक तुमच्या दारी) किंवा पोस्ट ऑफिसच्या डोअर स्टेप सेवेचा पेन्शनधारक लाभ घेऊ शकतात. या सेवेद्वारे पेन्शनधारक डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करू शकतात. अर्थातच पेन्शनधारकांसाठी ही गुड न्यूज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.