नवी दिल्ली, 1 जून : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान (Corona Second Wave) गरजेच्या वेळी नागरिकांना पैसे उभे करता यावेत, या हेतूनं कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संस्थेने (EPFO) आपल्या सदस्यांना विनापरतावा आगाऊ रक्कम सेवानिवृत्ती निधीतून ( non-refundable advance) काढण्यास परवानगी दिली आहे. मार्च 2020 मध्ये केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत (PMGKY) एक विशेष तरतूद केली होती. त्यानुसार ईपीएफच्या सदस्यांना त्यांचा तीन महिन्यांचा बेसिक पगार (Basic Salary) आणि महागाई भत्ता (Dearness Allowance) किंवा भविष्यनिर्वाह निधीतील 75 टक्के रक्कम यांपैकी जी कमी असेल ती रक्कम आगाऊ स्वरूपात काढण्याची परवानगी दिली होती. गेल्या वर्षी ईपीएफओनं आपल्या सदस्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकदा आगाऊ (One Time Advace) रक्कम काढण्यास परवानगी दिली होती. ज्यांनी या पहिल्या तरतुदीचा लाभ घेतला असेल, त्यांनाही यंदाच्या नव्या योजनेनुसार लाभ घेता येणार असून, पुन्हा रक्कम काढता येणार आहे.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आपल्या सदस्यांना गरजेच्या वेळी आर्थिक साह्य मिळावं, या हेतूनं ईपीएफओने आता सदस्यांना आपल्या खात्यातून दुसऱ्यांदा विनापरतावा आगाऊ रक्कम काढण्यास परवानगी दिली आहे. याबाबत कामगार आणि रोजगार मंत्रालयाने (Ministry Of Labour And Employment) दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे, की पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मार्च 2020मध्ये कोरोना काळात सदस्यांची आर्थिक गरज भागण्यासाठी रक्कम काढण्याची तरतूद करण्यात आली होती. या तरतुदीत आता पुन्हा बदल करण्यात आला आहे.
हे ही वाचा-SBI Alert! कॅश काढण्याच्या नियमांत बदल, एका दिवसांत काढता येणार इतकी रक्कम
ईपीएफने सदस्यांना आजारपण, घर खरेदी आदी गोष्टींसाठी विनापरतावा आगाऊ रक्कम निर्वाह निधीच्या खात्यातून काढण्यास परवानगी दिली आहे. कोरोना महामारीचे कारण देऊन कामगार त्यांच्या वैयक्तिक ईपीएफ अकाउंटमधून रक्कम काढू शकतात. कोरोना काळात मिळत असलेली ही आगाऊ विनापरतावा रक्कम ईपीएफ सदस्यांसाठी, त्यातही विशेषतः ज्यांचं मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे, अशा सदस्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. ईपीएफओने कोरोना काळात आगाऊ रकमेची मागणी करणारे 76.31 लाख दावे आतापर्यंत निकाली काढले असून, 18,698.15 कोटी रुपये वितरित केले असल्याचे मंत्रालयाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं.
ईपीएफओ कोरोना काळातील हे आगाऊ रकमेचे दावे (Claim) तीन दिवसांत निकाली काढत आहे. या कठीण काळात सभासदांना असणारी तातडीची आर्थिक गरज लक्षात घेऊन या दाव्यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय ईपीएफओनं घेतला आहे. ईपीएफओ हे दावे दाखल झाल्यापासून तीन दिवसांत ते निकाली काढण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आले. या क्लेम्सवर तातडीने प्रक्रिया व्हावी यासाठी सेवानिवृत्ती समितीने पूर्ण केवायसी कागदपत्रं असलेल्या सभासदांसाठी ऑटो-क्लेम सेटलमेंट (Auto-Claim Settlement) प्रक्रिया कार्यान्वित केली आहे. नियमांनुसार, 20 दिवसांच्या आता दावे निकाली काढणं आवश्यक असतं; मात्र सेटलमेंटच्या या प्रक्रियेमुळे ईपीएफओला दाव्यांचा निपटारा तीन दिवसांत करता येत आहे, असं सूत्रांनी सांगितलं.
कोरोना महामारीच्या काळात म्युकरमायकोसिस (Mucormycosis) अर्थात काळ्या बुरशीला नुकतंच साथीचा रोग म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. अशा कठीण काळात ईपीएफओ आपल्या सदस्यांना त्यांची आर्थिक गरज भागवण्यासाठी मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्या सदस्यांनी यापूर्वी पहिल्या तरतुदीनुसार आगाऊ रक्कम काढली आहे, ते आता दुसऱ्यांदादेखील रक्कम काढू शकतात. पहिल्या आगाऊ रकमेच्या वेळी जी प्रक्रिया होती, तशीच प्रक्रिया दुसऱ्यांदा आगाऊ रक्कम काढण्यासाठी असल्याचं मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.