नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : येत्या काही दिवसांत सर्वसामान्य नागरिकांना महागाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण खाद्यतेलांच्या किमतीत आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. जागतिक किमतींमध्ये झालेल्या घसरणीचा लाभ
ग्राहकांनाही मिळावा, यासाठी खाद्यतेल उत्पादक कंपन्या (Edible Oil Producer Company) आणि प्रक्रियाकर्ते (Processors) तयार झाले आहेत. खाद्यतेलाच्या (Edible Oil Price may fall) किमती 10-12 रुपयांनी कमी करण्यावर कंपन्यांमध्ये सहमती झाली असल्याचं समजतं.
'सीएनबीसी आवाज'च्या वृत्तात असं म्हटलं आहे, की खाद्यतेलांच्या जागतिक बाजारपेठेतल्या किमतींमध्ये झालेली घसरण पाहून खाद्यतेल उत्पादक कंपन्यांनी किमतीत 10-12 रुपयांनी घट करण्यास सहमती दर्शवली आहे, असं एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं. उत्पादक कंपन्यांशी माहितीसह विस्तृत चर्चा झाल्याचंही त्या अधिकाऱ्याने नमूद केलं.
भारत हा खाद्यतेलांचा मोठा आयातदार देश आहे. भारताच्या एकूण गरजेपैकी दोन तृतीयांश खाद्यतेल आयात केलं जातं. गेल्या काही महिन्यांत रशिया-युक्रेनचं युद्ध, तसंच इंडोनेशियाकडून अन्य देशांना पाम तेल निर्यात करण्यावर घालण्यात आलेले निर्बंध यांमुळे खाद्यतेलांच्या किमतीत मोठी वाढ झाली होती.
काही दिवसांपूर्वी इंडोनेशियाने (Indonesia) पाम तेलाच्या (Palm Oil) निर्यातीवरचे निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किमतीत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. या घडामोडीमुळे खाद्यतेलांच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता असल्याचा सरकारचा कयास आहे.
केंद्र सरकारने अशी अपेक्षा व्यक्त केली, की वितरकांनीही तातडीने किमती कमी केल्या पाहिजेत, जेणेकरून जागतिक बाजारपेठेत झालेल्या घसरणीचा लाभ ग्राहकांना लगेचच मिळू शकेल. उत्पादक किंवा रिफायनर्स यांच्याकडून वितरकांसाठी किंमत घटवली जाते, तेव्हा ग्राहकांनाही वितरकांकडून त्याचा लाभ दिला गेला पाहिजे, असं सरकारचं म्हणणं आहे. तसंच, या संदर्भात विभागाला वेळोवेळी माहिती देण्याची गरज आहे.
काही कंपन्यांनी अद्याप आपल्या खाद्यतेलाच्या किमती कमी केलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांची एमआरपी अन्य ब्रँड्सच्या तुलनेत जास्त आहे. अशा कंपन्यांनाही किमती घटवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
एकंदरीतच खाद्यतेलांच्या किमती तातडीने कमी झाल्या, तर सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकेल. कारण सध्या श्रावण महिना सुरू असून, पुढच्या महिन्यात गणपती आणि मग नवरात्रोत्सव आणि त्यानंतर दिवाळी असे सगळे सण लागोपाठ येतात. त्यामुळे खाद्यतेलाची मागणी वाढत जाते. अशा काळात किमतीत घट झाल्यास ग्राहकांना उपयुक्त ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.