• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • कोरोना काळातही गुजरातमधील या भागात आर्थिक समृद्धता; बँकांमधील FD चा आकडा पाहून चाट पडाल!

कोरोना काळातही गुजरातमधील या भागात आर्थिक समृद्धता; बँकांमधील FD चा आकडा पाहून चाट पडाल!

इकडे अशी अनेक छोटी गावं आहेत, ज्यांची लोकसंख्या जेमतेम पाच हजार आहे; पण तिथल्या एका बँकेत तब्बल 5 हजार कोटींच्या ठेवी असतात.

 • Share this:
  कच्छ (गुजरात), 2 जुलै : वैविध्यानं नटलेल्या आपल्या देशात राजस्थान, कच्छसारखे (Kutch) वाळवंटी प्रदेशही आहेत. या ओसाड वाळवंटी प्रदेशात पाण्याचं दुर्भिक्ष्य तर आहेच; पण इतरही अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे गेल्या अनेक पिढ्यांपासून इथले नागरिक नोकरीधंद्यासाठी परदेशात स्थायिक झाले आहेत. गुजरातमधला (Gujarat) कच्छ जिल्हा (Kutch) क्षेत्रफळाच्या बाबतीत दुर्गम लडाखनंतर देशातला दुसरा सर्वांत मोठा जिल्हा आहे; मात्र इथल्या लोकांनी सगळ्या संकटांना तोंड देऊन व्यापारउदीम पार जगभरात नेला आहे. देश असो की परदेश, कच्छमधल्या नागरिकांनी आर्थिक प्रगतीत मोठं योगदान दिलं आहे. व्यापाऱ्याच्या जोरावर या लोकांनी प्रचंड संपत्ती कमावली असून, त्यांच्या आर्थिक संपन्नतेचा पुरावा त्यांच्या बँकेतल्या ठेवी देतात. कच्छचा अनिवासी भारतीय (NRI) जगातल्या कोणत्याही देशात राहत असला, तरी आपल्या गावी असलेल्या बँकेत काही तरी ठेवी नक्की ठेवतो. सध्याच्या कोरोना विषाणूच्या साथीच्या (Coronavirus Pandemic) काळातही यात खंड पडलेला नाही. या काळातही कच्छच्या बँकामधल्या ठेवींमध्ये तब्बल 3400 कोटींची वाढ झाली आहे. कच्छी लोकांच्या आर्थिक समृद्धीचं हे लक्षण आहे. हे ही वाचा-FD गुंतवणुकदारांसाठी महत्त्वाची बातमी; जाणून घ्या फायदे आणि कर कपातीचे नियम अधिकृत माहितीनुसार, अनिवासी कच्छी लोकांनी कोरोना काळात बँकेत ठेवलेल्या ठेवींमध्ये 2016 ते 2019 या चार वर्षांतल्या ठेवींच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मार्च 2016 ते मार्च 2021 या कालावधीत एकूण 67 हजार 600 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. त्यापैकी कोरोनाच्या काळातल्या म्हणजे 2020 आणि 2021 या दोन वर्षांतल्या ठेवी 3400 कोटी रुपयांच्या आहेत. याबाबतीत माहिती देताना राजकोट सिटीझन्स बॅंकेचे (Rajkot Citizen Bank) समन्वयक दिलीप त्रिवेदी म्हणाले, आमच्या बँकेतील ठेवींमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परदेशात राहणारे पटेल चोविसी समाजातले लोक त्यांच्या मूळ गावी असलेल्या बँकांमध्ये ठेवी ठेवण्याला अधिक पसंती देतात. त्यामुळे जिल्हा बँकांमध्ये ठेवींचं प्रमाण जास्त असतं. कच्छी लोकांच्या विश्वासार्हतेचं हे लक्षण आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या समुदायाचे लोक नोकरी, व्यवसायानिमित्त इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका इथं स्थायिक झाले आहेत. त्यांचे व्यवसायही तिकडे चांगले चालले आहेत. ते लोक आपल्या मूळ गावी असलेल्या बँकामध्ये आवर्जून ठेवी ठेवतात. त्यामुळे इकडे अशी अनेक छोटी गावं आहेत, ज्यांची लोकसंख्या जेमतेम पाच हजार आहे; पण तिथल्या एका बँकेत तब्बल 5 हजार कोटींच्या ठेवी असतात. विश्वासार्हतेच्या बळावरच इथं ठेवी इतक्या मोठ्या प्रमाणात ठेवल्या जातात.'
  First published: