मुंबई, 1 नोव्हेंबर : दिवाळीचा सण (Diwali 2021) आता अगदी तोंडावर आला आहे. खरंतर आजपासून म्हणजेच वसुबारसेच्या दिवसापासून दिवाळी सुरू होते, असं मानलं जातं. तरीही धनत्रयोदशीच्या (Dhanteras) दिवसापासून खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू होते. आश्विन महिन्याच्या (Ashwin) कृष्ण पक्षातल्या त्रयोदशीला धनत्रयोदशी असं म्हटलं जातं. समुद्र मंथनादरम्यान भगवान धन्वंतरी या दिवशी सोन्याचा घोडा घेऊन प्रकट झाले होते, असं मानलं जातं. भगवान धन्वंतरी हे देवांचे वैद्य. त्यामुळे धनत्रयोदशीदिनी भगवान धन्वंतरी (Dhanvantari) यांचं पूजन केलं जातं. तसेच या दिवशी भगवान कुबेर आणि लक्ष्मीचं पूजनही केलं जातं. धनत्रयोदशीदिनी खरेदी करणं शुभ असतं, असं मानलं जातं. म्हणूनच धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीचे दागिने, भांडी, घरात लागणाऱ्या किमती वस्तू, कार, मोटारसायकल, जमीन, नवं घर आदींची खरेदी केली जाते. धनत्रयोदशीला खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये वर्षभरात 13 टक्के वाढ होते म्हणजेच घरात सुख-समृद्धी नांदते, पैशांची कमतरता भासत नाही, असं मानलं जातं.
धनत्रयोदशीच्या दिवशी घराबाहेर दिव्यांची रोषणाई केली जाते. भगवान धन्वंतरी यांचं पूजन या दिवशी केलं जातं. या दिवशी भगवान कुबेर, लक्ष्मी यांच्यासह भगवान धन्वंतरी यांची या दिवशी पूजा केल्यास घरात कायम धन-धान्य, सुख-समृद्धी, वैभव, आरोग्य यांचा वास कायम राहतो, असं मानलं जातं. या दिवशी बहुतांश व्यक्ती सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी करतात. त्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशीचा शुभमुहूर्तही (Muhurt) पाहिला जातो. कारण धनत्रयोदशीच्या दिवशीच्या शुभमुहूर्तावर ही खरेदी केल्यास त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतात.
मुलीचं भविष्य करा सुरक्षित; 'या' योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा 15 लाख
यावर्षी धनत्रयोदशी 2 नोव्हेंबर 2021 रोजी आहे. या दिवशी सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी सायंकाळी सहा वाजून 20 मिनिटांपासून रात्री आठ वाजून 11 मिनिटांपर्यंतचा कालावधी शुभ आहे. त्या दिवशी सकाळच्या वेळेचा विचार करायचा झाल्यास सकाळी 11.30 नंतर खरेदी केल्यास चालू शकेल; मात्र दोन नोव्हेंबरला राहू काळही आहे. तो टाळून खरेदी करावी. घरासाठी भांडी आणि अन्य साहित्याची खरेदी करण्यासाठी 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजून 15 मिनिटांपासून रात्री 8 वाजून 15 मिनिटांपर्यंतचा कालावधी चांगला आहे.
New IPO : नोव्हेंबरमध्ये कमाईच्या अनेक संधी; Paytm सह अनेक कंपन्यांचे IPO येणार
धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी यांचं षोडशोपचार पूजन करावं. या दिवशी सायंकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारात, अंगणात आणि घराच्या दक्षिण दिशेला दिवा जरूर लावावा. दक्षिण दिशेला लावला जाणारा दिवा हा यमासाठी असतो. कारण दक्षिण ही यमाची दिशा असते. या प्रथेला यमदीपदान असं म्हटलं जातं.
धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं, चांदी, पितळ आदी धातूंच्या गोष्टी आणि झाडू वगैरेंची खरेदी करणं शुभ मानलं जातं; मात्र या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू, तसंच काच, अॅल्युमिनियम आणि लोखंडी वस्तूंची खरेदी मात्र अजिबात करू नये, असं म्हटलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diwali 2021, Money