मुंबई, 17 नोव्हेंबर: तुम्हालाही सोन्यात गुंतवणूक (Investment in Gold) करायची आहे का? मग तुमच्यासाठी डिजिटल गोल्ड (Investment in Digital Gold) हादेखील एक चांगला पर्याय असू शकतो. सध्याच्या काळात डिजिटल गोल्डबद्दल बरीच चर्चा आहे. अनेक जण या पर्यायाचा गुंतवणुकीसाठी विचार करत आहेत आणि त्यात गुंतवणूक करतही आहेत. शेअर बाजाराची अनिश्चितता आणि महागाई या दोन कारणांमुळे अनेक जण डिजिटल गोल्ड या गुंतवणूक पर्यायाकडे आकर्षित होत आहेत.
डिजिटल गोल्ड म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल, तर त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. सध्या डिजिटल वॉलेट वापरण्याचं प्रमाण खूप मोठं आहे. त्या वॉलेटमध्ये असलेले पैसे तुमच्याकडे असतात; मात्र ते तुमच्या प्रत्यक्ष खिशात नसतात. तसंच डिजिटल गोल्डचं आहे. तुम्ही डिजिटल स्वरूपात सोनं खरेदी करू शकता; मात्र ते प्रत्यक्षात तुमच्या हातात नसतं, एवढाच त्यातला फरक आहे. डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक अगदी एक रुपयापासूनही सुरू करणं शक्य आहे. त्यापुढचे अनेक प्रश्न डोक्यात येतात, ते म्हणजे ही गुंतवणूक किती सुरक्षित आहे? त्यावर किती कर आकारला जातो? अशा काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या.
हे वाचा-SBI क्रेडिट कार्ड युजर्सना झटका! आता EMI ट्रान्झॅक्शन महागणार
डिजिटल गोल्डच्या गुंतवणुकीतील महत्त्वाचे मुद्दे
- खरेदी करणं सोपं
डिजिटल गोल्ड खरेदी करणं आता इतकं सोपं झालं आहे, की अगदी मोबाइल अॅपवरूनही (Mobile App) ते खरेदी करता येतं. प्रत्यक्ष सोनं खरेदी करायचं झालं, तर बजेट ही मोठीच अडचण ठरू शकते. डिजिटल गोल्डमध्ये मात्र बजेट हा अडथळा ठरत नाही.
- शुद्धता आणि सुरक्षेची काळजी नाही
सोनं खरेदी केल्यानंतर त्याच्या शुद्धतेविषयी काही वेळा शंका असते. तसंच, ते मौल्यवान असल्याने त्याच्या सुरक्षेसाठीही कायम सजग राहावं लागतं. डिजिटल गोल्डच्या बाबतीत हे दोन्ही निकष लागू होत नाहीत. कारण ते डिजिटल स्वरूपात असल्याने शुद्धतेची चिंता नाही आणि सांभाळण्याची कटकट नाही.
- संपूर्ण परतावा
डिजिटल गोल्डची विक्री ऑनलाइन स्वरूपात करता येते. विक्रीनंतर तातडीने सर्व पैसे (Returns) मिळतात. त्यासाठी कोणाकडेही तगादा लावावा लागत नाही.
- जीएसटी
डिजिटल गोल्ड खरेदी करताना तीन टक्के जीएसटी (GST) द्यावा लागतो. म्हणजेच एक हजार रुपयांचं डिजिटल गोल्ड खरेदी केलं, तर 30 रुपये जीएसटी कापून घेतला जाईल. म्हणजेच 970 रुपयांचं सोनं तुम्हाला मिळेल.
हे वाचा-Go Fashion IPO:आजपासून कमाईची संधी!या आयपीओमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं आहे का?
- अन्य शुल्क
डिजिटल गोल्ड खरेदी करताना एक वन टाइम चार्ज (One Time Charge) द्यावा लागतो. त्यात ट्रस्टी फीज, ट्रान्झॅक्शन कॉस्ट, मेन्टेनन्स चार्ज, प्रोसेसिंग फीज, इन्शुरन्स आणि स्टोरेज चार्जेस आदींचा समावेश असतो. तसंच, डिजिटल गोल्डची तुम्हाला प्रत्यक्ष अर्थात फिजिकल डिलिव्हरी हवी असेल, तर त्यासाठीही शुल्क द्यावं लागू शकतं.
- टॅक्सेस
डिजिटल गोल्डच्या विक्रीच्या बाबतीत लाँग टर्म कॅपिटल गेनवर फिजिकल गोल्डप्रमाणेच टॅक्स भरावा लागतो. म्हणजेच 20 टक्के टॅक्स आणि सेस व सरचार्ज. अर्थात ग्राहकाने खरेदी केलेलं डिजिटल गोल्ड तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत विकलं, तर त्यातून मिळालेल्या रिटर्न्सवर थेट टॅक्स लागत नाही.
- पाच वर्षांपेक्षा अधिक काळाच्या स्टोरेजसाठी चार्ज
डिजिटल गोल्ड पाच वर्षांपेक्षा अधिक काळ आपल्याकडे ठेवता येत नाही. तसं ठेवल्यास त्यासाठी वेगळे चार्जेस आकारले जातात.
- नियामक यंत्रणा नाही
डिजिटल गोल्डच्या व्यवहारांवर सध्या कोणतीही यंत्रणा देखरेख ठेवत नाही. सेबी किंवा भारतीय रिझर्व्ह बँक यांसारख्या सरकारी संस्थांचंही त्यावर सध्या नियंत्रण नाही.
हे वाचा-तुमच्या खात्यात आले आहेत का पेटीएमचे शेअर्स? अशाप्रकारे तपासा
- सरकारचा लवकरच निर्णय
क्रिप्टोकरन्सीप्रमाणेच डिजिटल गोल्डच्या बाबतीतही गुंतवणूकदारांकडून अनेक गोष्टी सांगितल्या जात आहेत. सरकारची आता यावर नजर असून, लवकरच त्यावर काही तरी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold bond, Gold price, Gold prices today