नवी दिल्ली, 28 डिसेंबर : भारतामध्ये विविध उद्योगांचा पाया घालण्याचं श्रेय टाटा उद्योग समूहाला जातं. या उद्योग समूहाच्या भरभराटीमध्ये माजी अध्यक्ष रतन टाटा यांचं मोठं योगदान आहे. बिझनेस टायकून आणि परोपकारी व्यक्ती अशी ओळख असलेले रतन टाटा आज (28 डिसेंबर) आपला 85वा वाढदिवस साजरा करत आहेत. केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील सर्वांत प्रतिष्ठित उद्योगपतींमध्ये त्यांचा समावेश होतो. टाटा उद्योग समूहाचा प्रचंड पसारा असूनही रतन टाटा यांचं नाव देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत का नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. ‘झी बिझनेस’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
रतन टाटा यांची एकूण संपत्ती तीन हजार 800 कोटी रुपयांची आहे. यातील बहुतेक संपत्ती टाटा सन्सकडून मिळालेली आहे. आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 नुसार, सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत ते 421 व्या स्थानावर होते. तर, 2021मधील रँकिंगमध्ये ते 433व्या स्थानावर होते. त्यावेळी त्यांच्याकडे तीन हजार 500 कोटी रुपयांची संपत्ती होती. श्रीमंतांच्या यादीमध्ये ते इतके खाली असण्यामागे अनेक कारणं आहेत. दानधर्म हे सर्वांत मोठं कारण आहे. टाटा समूहाच्या कंपन्यांनी कमावलेल्या एकूण नफ्यातील 66 टक्के नफा टाटा ट्रस्टच्या माध्यमातून परोपकारी कार्यांसाठी दान केला जातो.
हेही वाचा - आई आणि मुलाचं अतूट नातं; PM मोदींचे यांच्या आईसोबतचे हे खास फोटो बघितले का?
'टाटा सन्स' ही प्रमुख गुंतवणूक असलेली आणि इतर टाटा कंपन्यांची प्रमोटर आहे. टाटा सन्सच्या इक्विटी शेअर कॅपिटलपैकी 66 टक्के भाग सेवाभावी ट्रस्टकडे आहे. हा ट्रस्ट शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती, कला आणि संस्कृतीला पाठिंबा देतो. मिठाच्या निर्मितीपासून ते आयटीपर्यंतच्या सर्व प्रकारच्या व्यवसायात टाटा समूहानं प्रवेश केलेला आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटनुसार, टाटाचे 31 मार्च 2022 पर्यंत 311 अब्ज डॉलर्सचं (23.6 ट्रिलियन रुपये) एकत्रित बाजार भांडवल असलेले एकूण 29 सार्वजनिक-सूचीबद्ध उद्योग आहेत.
रतन टाटा आणि त्यांचे कुटुंब अर्धशतकाहून अधिक काळापासून समाजसेवा करत आहेत. त्यांचे आजोबा सर जमशेटजी टाटा यांनी या कामाची सुरुवात केली होती. समूहाच्या अधिकृत वेबसाइटनुसार 2021-22 मध्ये, टाटा कंपन्यांचा एकत्रित महसूल 128 अब्ज डॉलर्स (9.6 ट्रिलियन रुपये) इतका होता. या समुहामध्ये नऊ लाख 35 हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात.
तरुणांमध्ये देखील रतन टाटा प्रचंड लोकप्रिय आहेत. ट्विटवर त्यांचे 118 लाख फॉलोअर्स आहेत. आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 नुसार, रतन टाटा हे सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केलेले भारतीय उद्योगपती आहेत. या वर्षी त्यांच्या ट्विटर फॉलोअर्समध्ये 18 लाखांची वाढ झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Ratan tata