नवी दिल्ली, 14 डिसेंबर: कोरोना लस (Corona Vaccination) बाजारात येणार या आशादायक बातमीनंतर कापसाच्या दरात (Cotton Rate) वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही कापसाच्या किमतीने गेल्या 2 वर्षातील उच्चांक गाठला आहे. आज प्रति बेल्सची कमाल किंमत 20,100 रुपयांवर पोहचली आहे. दुसरीकडे, अमेरिकन कॉटन मार्केटमध्ये (American Cotton Market) मे 2019 नंतर पहिल्यांदाच तेजी दिसून आली आहे. कापसाच्या वाढत्या किंमतींचा परिणाम थेट सर्वसामान्यांवर होणार आहे. कारण दररोज वापरातील टॉवेल्स, बेडशीट, रुमाल यांसारख्या वस्तू सूती कापडाने बनवल्या जातात.
जानेवारी महिन्यात लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी कापसाची किंमत प्रति बेल्स 20 हजार रुपये इतकी होती. लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान मात्र कापसाची किंमत फारच कमी झाली. अशी परिस्थिती असताना कोरोना लस तयार झाल्याची बातमी समोर येताच बाजारात आर्थिक हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे बाजारात कापसाची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळेच एकंदरित कापसाचे दर वाढताना दिसत आहेत.
कापसाच्या किंमतीत घट होण्याची कमी शक्यता
मल्टी कमोडिटी एक्सचेंजच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या कापसाच्या दरात घट होण्याची शक्यता कमी आहे. कारण देशासह परदेशातही कापसाची मागणी झपाट्याने वाढली आहे. अशा परिस्थितीत कापसाचे दर प्रति बेल्स किमान 20 हजार रुपयांच्या वर असण्याची शक्यता आहे. ज्याचा गुंतवणुकदारांना थेट फायदा होईल.
उत्पादनात झालेल्या घसरणीमुळे देखील किंमत वाढली
यंदा मुसळधार पावसामुळे कापूस पिकाचं बरंच नुकसान झालं आहे. यामुळे यंदा कापसाचे उत्पादनही तुलनेत कमी झालं आहे. गेल्या वर्षी देशात कापसाचं एकूण उत्पादन 360 लाख बेल्स इतकं झालं होतं. यावर्षी सुमारे 356 लाख बेल्सच्या आसपास कापसाचं उत्पादन झालं आहे.
1 बेल्स म्हणजे 170 किलोग्रॅम
बेल्स हे कापूस मोजण्याचं एकक आहेत. जगभर हेच एकक वापरलं जातं. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशातील एकूण 450 केंद्रांपैकी 390 केंद्रांवर किमान आधारभूत किंमतीने कापूस खरेदी सुरू आहे. सरकारने रॉ कॉटनसाठी ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021 साठी प्रति क्वींटल 5 हजार 850 रुपये इतका एमएसपी निश्चित केला आहे.