मुंबई, 30 ऑक्टोबर : गेल्यावर्षी जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या तुलनेत देशात सोन्याची मागणी 30 टक्क्यांनी घटली आहे. मागील वर्षी जिथे देशात सोन्याची मागणी 123.9 टनपर्यंत होती. तिथे आता जुलै ते सप्टेंबर या कालावधीत 86.6 टनवर आली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (डब्ल्युजीसी) केलेल्या अहवालात याबद्दल माहिती देण्यात आली आहे. अलीकडच्या काळात कोरोना विषाणू संसर्ग आणि सोन्याच्या किमतींत झालेली वाढ ही यामागील सर्वांत मोठी कारणं असल्याचं मानलं जात आहे.
सोन्यात गुंतवणूक वाढली
गेल्या काही काळात देशातील दागिन्यांची मागणी 48 टक्क्यांनी घसरून 52.8 टनवर आली आहे. किमतीच्या आधारे बघायचं तर या काळात दागिन्यांची मागणी 29 टक्क्यांनी घसरून 24,100 कोटी रुपयांवर आली आहे. तसंच सोन्याची नाणी, बार आणि ईटीएफची मागणी वाढली आहे. गेल्या तिमाहीत सोन्याची गुंतवणूक 52 टक्क्यांनी वाढून 33.8 टन झाली आहे. किमतींच्या आधारे बघितल्यास सोन्यातील गुंतवणुकीची मागणी 15,410 कोटी रुपयांनी वाढली आहे.
संपूर्ण जगात सोन्याची मागणी कमी झाली आहे
जागतिक स्तरावर जुलै ते सप्टेंबरदरम्यान सोन्याची मागणी वार्षिक आधारावर 19 टक्क्यांनी घसरून 892 टन झाली आहे. covid-19 साथीच्या आजारांमुळे सोन्याच्या खरेदीवर परिणाम झाला आहे. डब्ल्युजीसीनी असं म्हटलं आहे की 2009 नंतर पहिल्यांदाच वर्षातील कोणत्याही तिमाहीतील आकडेवारी पाहिली तर हा सर्वांत कमी आकडा आहे.
हे ही वाचा-
Gold Silver Rates: 1277 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोन्याचीही झळाळी उतरली
जगभर सोन्यातील गुंतवणुकीत झाली वाढ
सोन्याच्या जागतिक गुंतवणुकीत 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जगभरातील गुंतवणुकदारांनी 221.1 टन सोन्याची गुंतवणूक केली आहे. यात सोन्याची नाणी आणि बार यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त गुंतवणूकदारांनी ईटीएफच्या माध्यमातून 272.5 टन सोन्याची गुंतवणूक केली आहे.
सोन्याच्या मागणीत घट का झाली
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या वर्षी सोन्याच्या मागणीत मोठी घसरण अनेक कारणांमुळे झाली आहे. बाजारपेठेमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळावं लागतंय, अर्थव्यवस्थेतील सोन्याच्या किमतींत झालेली वाढ यामुळे ग्राहकांनी सोनं खरेदी करणं टाळलं आहे.
मागील 25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला जाऊ शकतो
सोन्याच्या मागणीत ही घसरण सुरू राहिल्यास गेल्या 25 वर्षांत झाली नव्हती इतकी सोन्याची मागणी खाली जाईल. या वर्षी आतापर्यंत सोन्याची मागणी फक्त 252 टन आहे. तसेच मागील वर्षी ती 496 टन होती. आता आर्थिक घडामोडींना वेग आला आहे तसेच उत्सवाचा हंगामही सुरू झाला आहे त्यानंतर विवाह सोहळे सुरू होतील, त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर यादरम्यान सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.