मुबंई, 10 जून : तीन लाखांपर्यंत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज आकारण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसंच एक लाख ते तीन लाखांपर्यंतच्या कर्जाची मुदतीत परतफेड केल्यास, दोन टक्के व्याज दर सवलत देण्यात येणार आहे. दोन टक्के व्याज दर सवलत दिल्याने लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. गुरुवारी (10 जून) रोजी मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचं पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली होती. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानंतर राज्य शासन देत असलेली तीन टक्के व्याज दर सवलत आणि केंद्र शासनाकडून मिळणारी तीन टक्के व्याज दर सवलत या दोन्हीचा एकत्रित फायदा मिळाल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये मुदतीत अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते. आता एक लाख ते तीन लाख रुपये या कर्ज मर्यादेमध्ये शेतकऱ्यांनी अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड निर्धारित मुदतीमध्ये केल्यास त्यांना अधिक दोन टक्के व्याज दरात सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News