नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : केंद्र सरकारने करदाते अर्थात टॅक्सपेयर्सला मोठा दिलासा दिला आहे. इनकम टॅक्ससंबंधी (Income Tax) वाद सोडवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'विवाद से विश्वास' (Vivad Se Vishwas) या योजनेची शेवटची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आता टॅक्सपेयर्ससाठी ही तारीख 31 डिसेंबर 2020 पासून वाढवून, 31 मार्च 2021 पर्यंत केली आहे. त्यामुळे टॅक्सपेयर्स 31 मार्च 2021 पर्यंत टॅक्ससंबंधी वाद सोडवू शकतात.
'विवाद से विश्वास' काय आहे ही योजना -
प्रलंबित टॅक्स वाद-विवादांचं निराकरण करणं हे या 'विवाद से विश्वास' योजनेचं उद्दिष्टय आहे. न्यायालयांमध्ये प्रत्यक्ष टॅक्सशीसंबंधीत 9.32 लाख कोटी रुपयांची 4.83 लाख प्रकरणं प्रलंबित आहेत. या योजनेअंतर्गत करदात्यांना केवळ विवादित टॅक्स रक्कम द्यावी लागणार आहे. त्यांना व्याज आणि दंडावर संपूर्ण सूट मिळेल.
(वाचा - सर्वसामान्यांना आणखी एक झटका, कांद्यानंतर आता या तेलाच्या किंमती वाढणार)
कोण घेऊ शकतं या योजनेचा फायदा -
31 जानेवारी 2020 पर्यंत जी प्रकरणं कमिश्नर, इनकम टॅक्स अपीलीय ट्रिब्यूनल, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात प्रलंबित होती, त्या टॅक्ससंबंधी प्रकरणांवर ही योजना लागू असणार आहे.
अधिकृत माहितीनुसार, 'विवाद से विश्वास' या योजनेअंतर्गत टॅक्ससंबंधी विवाद प्रकरणात करदात्यांना दिलासा देण्यासाठी, यासाठीची शेवटची तारीख वाढवण्याचं पाऊल उचलण्यात आलं. सरकारने मंगळवारी, कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय, वेळमर्यादा 31 मार्च 2021 पर्यंत वाढवली आहे.