मुंबई, 08 नोव्हेंबर: कोरोना (Corona) काळात रोजगार गेल्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. त्यांची आर्थिक चणचण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने एक योजना राबवली आहे. सरकारने कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC)च्या अटल विमा कल्याण योजनेची (ABVKY) घोषणा केली होती. कोरोना काळात बेरोजगार झालेल्या लोकांनी दावा (Claim) केल्यानंतर 15 दिवसांच्या आत सरकारकडून उत्तर मिळणार आहे. 20 ऑगस्ट 2020 रोजी ही घोषणा करण्यात आली होती. नोकरी गमावलेला लोकांना तीन महिन्यांच्या सरासरी पगाराचा 50 टक्के लाभ देण्याची घोषणा केली गेली, जी आधी 25 टक्के होती. या योजनेंतर्गत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची अटही केंद्राने रविवारी रद्द केली आहे.
क्लेम करण्यासाठी या कागदपत्रांची कॉपी स्कॅन करा
अटल विमा व्यक्ती कल्याण योजनेतून लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. तुम्हाला फक्त आधार कार्ड आणि बँकेच्या खात्याची माहिती देणारी कागदपत्र स्कॅन करुन अपलोड करायची आहे. तसंच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणं शक्य नसेल तर गरजू व्यक्तींना आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती देणारी कागदपत्र तुमच्या सहीसकट जमा करायची आहेत.
योजनेचा लाभ कोणाला?
ESICच्या योजनेनुसार, खासगी कंपन्या, कारखाने आणि कारखान्यात काम करणाऱ्या याचा लाभ कर्मचाऱ्यांना होणार आहे. कंपनीतल्या अधिकृत कागदपत्रांच्या आधारे कर्मचारी योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ फक्त 21,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी पगाराच्या कर्मचार्यांना उपलब्ध आहे. अपंग कर्मचाऱ्यांना उत्पन्नाची मर्यादा 25,000 रुपये आहे. त्याचबरोबर ईएसआयसी अंतर्गत कंपनीची नोंदणी होणे देखील आवश्यक आहे. ईएसआयसीशी संबंधित कर्मचारी त्यासाठी महामंडळाच्या कोणत्याही शाखेत अर्ज करु शकतात.
40 लाख औद्योगिक कामगारांना फायदा
ज्या कर्मचाऱ्यांचं नाव गेल्या 2 वर्षापासून ईएसआयसी योजनेमध्ये आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसंच संबंधित कर्मचाऱ्यांचे 1 ऑक्टोबर 2019 ते 31 मार्च 2020 पर्यंत कमीतकमी 78 दिवस काम करणे देखील आवश्यक आहे. नोकरी गेल्यानंतर 30 दिवसांनी कर्मचारी या योजनेसाठी दावा करू शकतात. या निर्णयाचा 40 लाख औद्योगिक कामगारांना फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.