Home /News /money /

सेंट्रल बँकांना विकावं लागतंय सोनं; 10 वर्षांत पहिल्यांदाच आली ही वेळ!

सेंट्रल बँकांना विकावं लागतंय सोनं; 10 वर्षांत पहिल्यांदाच आली ही वेळ!

वाचा काय आहे यामागील कारणं...

    नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : गेल्या दहा वर्षांत पहिली अशी वेळ आहे जेव्हा सेंट्रल बँकांनी सोने विकण्यास सुरुवात केली आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या वेळी सोन्याच्या किंमती अधिकच वाढल्या. त्यानंतर काही सोन्याचे उत्पादन करणाऱ्या देशांनी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या तिमाहीत सोन्याची एकूण विक्री सुमारे 12.1 टन इतकी झाली. गेल्या वर्षी विविध देशांच्या सेंट्रल बँकांनी सुमारे 141.9 टन सोन्याची खरेदी केली होती अशी माहिती वर्ल्ड गोल्ड कौन्सिलकडून मिळाली आहे. ज्या देशांच्या सेंट्रल बँकांनी सर्वांत अधिक सोने विकलं आहे या देशांमध्ये उझबेगिस्तान आणि तुर्की हे देश पहिले आहेत. रशियाच्या सेंट्रल बँकेने गेल्या 13 वर्षांत पहिल्यांदा सोन्याची विक्री केली आहे. पुढील वर्षी सेंट्रल बँका मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करू शकतात एक्सचेंज ट्रेडेड फंडात वाढत्या गुंतवणुकीमुळे सोन्याच्या किमती या वर्षी वाढल्या होत्या. गेल्या काही वर्षांत सेन्ट्रल बँकांनी बरंच सोने खरेदी केलं होतं. गेल्या महिन्यातच सिटी ग्रुपने लावलेल्या अंदाजानुसार 2021 मध्ये पुन्हा एकदा केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतील. 2018 आणि 2019 मध्ये विक्रमी खरेदी केल्यानंतर या वर्षीच्या खरेदीमध्ये थोडा फरक जाणवला आहे. तुर्की आणि उझबेगिस्तानने किती सोनं विकलं? तज्ञांच्या म्हणण्यानुसार सध्याच्या परिस्थितीत या बँकांनी आपल्या सेंट्रल बँकेच्या गोल्ड रिझर्व्हकडे जास्त लक्ष दिले आहे याच्यात आश्चर्यकारक काहीच नाही. तिसऱ्या तिमाहीत तुर्की आणि उझबेगिस्तानच्या केंद्रीय बँकांनी अनुक्रमे 22.3 टन आणि 34.9 टन इतकी सोन्याची विक्री केली. उझबेगिस्तान आता आपल्या आंतरराष्ट्रीय राखीव संपत्तीला डायव्हर्सिफाय करण्याच्या प्रयत्नात आहे. तिसऱ्या तिमाहीतील आकडेवारी वरून असे दिसून आले आहे की सोन्याच्या मागणीत वार्षिक आधारावर तब्बल 19 टक्क्यांनी घट झाली आहे. वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या म्हणण्यानुसार सोन्याच्या मागणीतील ही घसरण भारतीय दागिन्यांना कमी मागणी मिळाल्यामुळे झाली आहे. चीनमधील दागिन्यांचा कमी वापर हे पण याचं मुख्य कारण आहे. हे ही वाचा-मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, तर जाणून घ्या डेटा कसा इरेज कराल? बाजारातील सोन्याच्या दरावर याचा होणारा परिणाम कोरोना विषाणू साथीच्या काळात बहुतेक देशांना आर्थिक मदतीची घोषणा करत आहेत. सध्या सोन्याच्या किमतीत होणारी वाढ लक्षात घेता या प्रसंगाचा सामना करण्यासाठी केंद्रीय बँका सोन्याची विक्री करीत आहेत. जरी इतर केंद्रीय बँकांनी सोन्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला तरी त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होईल, कारण पूर्वी सेंट्रल बँकानी सोन्याची सर्वाधिक खरेदी केली होती. परंतु असेही बोलले जाते आहे की सोन्याच्या किमतीवर होणारा हा परिणाम हा काही कालावधीसाठीच असणार आहे सेंट्रल बँक का सोन्याची खरेदी-विक्री का करतात कोणत्याही देशाची सेंट्रल बँक या त्यांच्या चलनाचं अवमूल्यन लक्षात घेऊन सोने खरेदी करण्याचा किंवा विक्री करण्याचा निर्णय घेते. साध्या भाषेत सांगायचं झालं तर बहुतेक देश आपलं परकीय चलन फक्त डॉलरमध्ये ठेवतात. अशावेळी जर डॉलरची किंमत जास्त असेल किंवा त्या देशाचे चलन कमकुवत असेल तर डॉलर विकत घेणे किंवा इतर देणी डॉलरच्या मार्फत करणं त्या देशाला महाग पडतं. त्याऐवजी सोन्याचा पुरेसा साठा झाल्यास सेंट्रल बँक आपल्या सोन्याचे रूपांतर चलनात करून देणी देऊ शकते. यामुळे डॉलरवर अवलंबून रहावं लागत नाही व सोन्याच्या किमतीं तुलनेनी स्थिर असल्यामुळे नुकसान कमी होतं. जगातील सगळ्यात जास्त सोनं असणारे देश वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालात असं म्हटलं आहे की अमेरिकेकडे जगातील सर्वांत जास्त सोन्याचे साठे आहेत. अमेरिकेकडे राखीव एकूण 8,133.5 टन सोनं आहे. जर्मनी हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा साठा असणारा देश आहे. जर्मनीकडे एकूण 3,369.70 टन सोनं आहे. इटलीकडे एकूण 2,451.8 टन सोन्याच्या ठेवी आहेत. त्याचबरोबर फ्रान्स हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सोन्याचा साठा असणारा देश असून त्यांच्याकडे 2436 टन सोनं आहे. फ्रान्सच्या परकीय चलनाच्या 63 टक्के वाटा या सोन्याचाच आहे. या यादीत भारत अकराव्या क्रमांकावर आहे. भारताकडे सध्या 608.7 टन सोनं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Gold

    पुढील बातम्या