मुंबई: बांबूपासून बनवलेल्या विविध वस्तूंचा वापर करण्याचं प्रमाण आजकाल वाढत आहे. अनेकदा तुमच्या शहरामध्येही बांबूच्या विविध वस्तू एखाद्या प्रदर्शनात विक्रीसाठी आलेल्या तुम्ही पाहिल्या असतील. पण तुम्हाला माहिती आहे का, बांबूपासून वस्तू बनवण्याच्या व्यवसात एका कुटुंबानं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय.
सरकारनं पुर्नवापर करता न येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घातल्यानंतर बांबूपासून बनवलेल्या वस्तूंची विक्री वाढलीय. बांबूपासून अनेक सुंदर वस्तू बनवण्यासाठी बिहार राज्यातील कटिहार जिल्ह्यातील मनिहार ब्लॉकमध्ये राहणाऱ्या रेविका टुडू आणि गॅब्रियल हांसदा या जोडप्याची सध्या खूप चर्चा होतेय.
या दोघांनी संपूर्ण परिसरात वेगळी ओळख निर्माण केलीय. त्यांनी हातानं बनवलेल्या बांबूच्या वस्तूंना देशातील विविध शहरांतून मागणी आहे. पाटण्यासह बिहारमधील विविध जिल्ह्यांत, तसंच मुंबई, दिल्ली, जम्मू, कोलकाता अशा विविध शहरांमध्ये या वस्तूंची मागणी आहे. हे दोघेजण आता बांबूपासून वस्तू बनवण्यासोबतच इतर महिलांनाही प्रशिक्षण देतात.
विविध वस्तूंची निर्मिती
गॅब्रियल हे सुशिक्षित आहेत. सुरुवातीला ते बांबूपासून टोपल्या आणि सुप बनवायचे. मात्र हे काम पावसाळ्यात बंद राहत होते. त्यांचे पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील रेविका टुडू यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांनी रेविका यांच्या माहेरी बांबूच्या वस्तू बनवण्याचं काम शिकून घेतलं. त्यानंतर गॅब्रियल यांनी स्वतःच्या घरात बांबूपासून टोपल्या व सुप बनवण्यासोबतच दागिने ठेवण्यासाठीचा बॉक्स, केसांच्या क्लिप, कानातले, पेंटिंग बॉक्स आणि इतर वस्तू बनवायला सुरुवात केली.
आता गॅब्रियल व रेविका हे दोघे विविध जिल्ह्यांत आयोजित केलेल्या प्रदर्शनांमध्ये बाबूंच्या वस्तूंचा स्टॉल लावतात. आता त्यांना दिल्ली-मुंबईसह इतर शहरांमधून फोनवरून ऑर्डर मिळतात. पाटणा येथे आयोजित केल्या जाणाऱ्या प्रदर्शनाशिवाय पूर्णिया आणि कटिहार येथे विविध ठिकाणी आयोजित केलेल्या प्रदर्शनांमध्येही दोघांच्या उत्पादनांची चांगली विक्री होते.
प्रशिक्षण देण्याची मिळाली जबाबदारी
स्वतःच्या व्यवसायाबाबत बोलताना गॅब्रियल यांनी सांगितलं की, ‘सुरुवातीला मार्केट मिळत नसल्यामुळे जेवढे आम्ही कष्ट करीत होते, त्या प्रमाणात उत्पन्न कमी मिळत होते. काही वर्षांपूर्वी जीविका संस्थेच्या एका कर्मचाऱ्यानं बांबूचं साहित्य पाहिलं. त्यानंतर त्यांनी मला व माझ्या पत्नीला घेऊन जीविका कार्यालयात नेलं. तेथील अधिकाऱ्यांना आम्ही बनवलेल्या बांबूच्या वस्तू आवडल्या.
यानंतर मी वेणू शिल्प जीविका प्रॉडक्शन ग्रुपचा सदस्य झालोय तर माझी पत्नी रेविका ही जीविकाच्या आशा ग्रुपची सदस्य आहे. जीविकामध्ये सहभागी झाल्यानंतर आम्हाला खूपच चांगला अनुभव येतोय. सुरुवातीला आम्ही स्वयंरोजगारासाठी 20 हजार रुपयांचं कर्ज घेतलं. काही महिन्यांत कर्जाची परतफेड केली. आता हस्तकलेतून दरमहा 15 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असून एका वर्षात 1 लाख 80 हजार रुपये मिळतात.’
दरम्यान, बांबूपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तूंना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. या व्यवसातून आता चांगले उत्पन्नही मिळू लागले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business, Business News, Small business