Home /News /money /

LIC पॉलिसीधारकांनी बातमी वाचाच! बजेटमध्ये झालेल्या घोषणेनंतर असा होणार परिणाम

LIC पॉलिसीधारकांनी बातमी वाचाच! बजेटमध्ये झालेल्या घोषणेनंतर असा होणार परिणाम

केंद्र सरकार LIC मधला मोठा हिस्सा विकणार असल्याचं जाहीर केल्याने सर्वसामान्य चिंतेत आहेत.

    मुंबई, 04 फेब्रुवारी :‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ म्हणत भारतीय जीवन विमा निगम अर्थात LICने पॉलिसीचं महत्त्व सर्वांनाच पटवून दिलं. पॉलिसी काढून निश्चिंत राहण्याचं आवाहन वारंवार LICने आपल्या जाहिरातीमधून केलं. परंतु, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, केंद्र सरकार LIC मधला मोठा हिस्सा विकणार असल्याचं जाहीर केल्याने सर्वसामान्य चिंतेत आहेत. कारण, केंद्र सरकार एलआयसीचे आयपीओ आणणार असून या अंतर्गत एलआयसीमधील मोठा समभाग विकणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. सरकारच्या या घोषणेनंतर LICच्या कर्मचारी संघटनांनी एक तासाचं ‘वॉक आऊट’ आंदोलन केले होते. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाने पॉलिसीधारकांवरही परिणाम होणार असल्याचं सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुलै 2019 पर्यंत LIC कडे एकूण 31.11 लाख कोटींची संपत्ती होती. दरवर्षी सरकारी सिक्योरिटी आणि स्टॉक मार्केटमध्ये LICची सर्वात मोठी गुंतवणूक असते. दरवर्षी स्टॉक मार्केटमध्ये LIC सरासरी 55 ते 65 हजार कोटींची गुंतवणूक करते. तसेच, डिबेंचर्स आणि बॉन्डस् मध्येही LICने मोठी गुंतवणूक ठेवली आहे. 4,34,959 कोटी रुपये इतका हा आकडा आहे. इन्फ्रास्ट्रक्चर फंडिंगमध्ये मार्च 2018 पर्यंत LICने 3,76,097 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती 2017-18च्या वार्षिक अहवालात LICने दिली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 साठी केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीचे लक्ष्य जवळपास दुप्पट केले आहे. चालू आर्थिक वर्षासाठी धोरणात्मक निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट 65 हजार कोटी रुपये ठेवले आहे. आता पुढील आर्थिक वर्षासाठी ती 1.20 लाख कोटी रुपये करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी सरकारने 1.05 लाख कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले होते, ज्यामध्ये 18 हजार कोटी रुपये मिळविण्यात सरकारला यश आले आहे. एलआयसीचा आयपीओ हा देशातील सर्वात मोठा आयपीओ असल्याचे सिद्ध होऊ शकते. जर सरकारने एलआयसीचा आयपीओ आणला तर त्यात मोठ्या प्रमाणात भांडवल होईल आणि वित्तीय तूट भरुन काढण्यास मदत होईल. अर्थसंकल्पात सरकारने वित्तीय तूट सध्याच्या जीडीपीच्या 3.3 टक्क्यांवरून 3.8 टक्क्यांपर्यंत वाढविली आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी हा अंदाज 3.5 टक्के आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Budget 2020, LIC, LIC POILICY

    पुढील बातम्या