नवी दिल्ली, 09 जून: बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda) अकाउंट असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ही सरकारी बँक 46 खात्यांची विक्री करणार आहे. ज्या ग्राहकांनी त्यांच्या कर्जाची परतफेड केली नाही आहे, त्या खात्यांची बँक विक्री करणार आहे. लिलावाच्या माध्यमातून ही विक्री केली जाणार आहे. अशाप्रकारे कर्ज चुकवणाऱ्या खात्यांतून (NPA Account) बँक जवळपास 597.41 कोटींची वसूली करेल. बँकेने यासंदर्भात अधिसूचना जारी करत माहिती दिली आहे.
ही खाती ऑनलाईन लिलावाद्वारे विक्री केली जातील. ही खाती मालमत्ता पुनर्निर्माण कंपन्या (ARC), बँका किंवा अन्य वित्तीय संस्थांना रोख स्वरूपात विकली जाऊ शकतात. 21 जून रोजी लिलाव प्रक्रिया होणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.
कोणती खाती विकली जातील
एनपीए खात्यांच्या विक्रीमध्ये समाविष्ट असणाऱ्या खात्यात मुख्यत: मीना ज्वेल्स एक्सपोर्ट्स अँड मीना ज्वेलर्स एक्सपोर्ट्सचे खाते आहे, ज्यामध्ये 60.76 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यासह क्रिस्टल केबल इंडस्ट्रीज 57.49 कोटी रुपये, जेआर फूड्स लिमिटेड 41.60 कोटी, श्री रघुवंशी फायबर 27.38 कोटी रुपये, कनेरी अॅग्रो इंडस्ट्रीजने 24.69 कोटी रुपये, मॅन ट्यूबिनॉक्स 24.28 कोटी रुपये आणि आर्यन्स एज्युकेशनल आणि चॅरिटेबल ट्रस्टला 20.79 कोटी रुपये थकबाकी असणारी खाती समाविष्ट आहेत.
हे वाचा-इंधनाचा भडका! मुंबईमध्ये पेट्रोल 102 रुपये लीटर, किंमतींनी गाठला उच्चांक
या उद्देशासाठी पत्र सादर करण्याची शेवटची तारीख 1 जून आहे. या पत्रांच्या पडताळणीचे काम त्याच दिवशी पूर्ण होईल, असे बँकेने म्हटले आहे. बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, दिवाळखोरी संबंधित तरतुदींचे पालन करून निविदा दाखल करणाऱ्यालाही प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. ज्यामध्ये ते पुष्टी करतील की ते कोणत्याही प्रकारे कोणत्याही प्रमोटरच्या खात्याशी संबंधित नाही आहेत.
NPA Account म्हणजे काय?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमांनुासर एखाद्या बँक कर्जाचा हप्ता किंवा कर्ज 90 दिवसात अर्थात तीन महिन्यात फेडले नाही तर त्याला नॉन परफॉर्मिंग अॅसेट मानले जाते. अन्य आर्थिक संस्थांमध्ये ही मर्यादा 120 दिवस आहे. अर्थात कोणत्याही कर्जाचा EMI तीन महिन्यांमध्ये एकदाही तुम्ही भरला नाही तर बँक त्या खात्याला NPA म्हणून घोषित करेल. बँकेमध्ये NPA वाढणं हे त्या बँकेच्या टिकावाच्या दृष्टीने योग्य नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank, Bank details