नवी दिल्ली, 09 जानेवारी: गेल्या वर्षात 2020 मध्ये नोकऱ्यांबाबत काय परिस्थिती होती, हे सर्वांनीच अनुभवले. मात्र या नवीन वर्षात आनंदाची बातमी म्हणजे 2021 मध्ये चांगल्या नोकऱ्या उपलब्ध होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. Naukri.com च्या ताज्या अहवालानुसार गेल्या काही महिन्यांपासून नोकरी संदर्भातील परिस्थिती हळू हळू सुधारत आहे. कोरोना व्हायरस लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) काळात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या असल्या, तरीही हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. नोव्हेंबर 2020 च्या तुलनेत डिसेंबर 2020 मध्ये 14 टक्क्यांनी नोकऱ्या वाढल्या आहेत. 2021 मध्ये नोकऱ्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे सध्या सुस्ती असणाऱ्या क्षेत्रांमध्येही लवकरच हायरिंग (Hiring) सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नोकऱ्यांचं वर्ष असणार 2021
2020 मध्ये ज्यांच्या नोकऱ्या गेल्यात त्यांनी खचून न जाता, 2021 मध्ये नव्या उमेदीने काम शोधण्यास सुरुवात करणं गरजेचं आहे.
Naukri.com च्या अहवालानुसार, डिसेंबरमध्ये नोकर्या वाढल्या आहेत. नोव्हेंबरच्या तुलनेत नोकरीमध्ये डिसेंबरमध्ये 14 टक्के वाढ दिसून आली आहे. या सर्व्हेनुसार वाढीचा हा कल नव्या वर्षातही कायम राहील.
(हे वाचा-2 लाखांपर्यंत दागिने खरेदी करण्यासाठी लागणार KYC?अर्थ मंत्रालयाने दिली ही माहिती)
काय असणार Hiring ची परिस्थिती?
या सर्वेक्षणानुसार वैद्यकीय आणि आरोग्य सेवेतील नोकर्या वाढल्या आहेत. फार्मा आणि बायोटेकमध्ये देखील व्हेकन्सी आहे. आयटी आणि सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये देखील नवीन नोकऱ्यांबाबत उत्साह पाहायला मिळेल. दरम्यान अजूनही हॉस्पिटॅलिटी, प्रवास या क्षेत्रात समस्या कायम आहेत. एफएमसीजी, ऑटोदेखील फारसे उत्साहवर्धक नाहीत. या क्षेत्रात भविष्यात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
कुणाची मागणी जास्त आहे?
Naukri.com च्या या जॉब सर्व्हेनुसार बँकिंग आणि विमा एक्झिक्यूटिव्ह, फार्मा, बायोटेक, वैद्यकीय क्षेत्रातील जागा, आयटी, तसंच सॉफ्टवेअर व्यावसायिकांना सर्वाधिक मागणी आहे. मध्यम स्तरीय व्यवस्थापन, 8 ते 12 वर्षांचा अनुभव असलेले लोकं, सीनिअर मॅनेजमेंट आणि लीडरशीपसाठी देखील मागणी वाढली आहे.
(हे वाचा-SBIने स्वस्त केलं गृह कर्ज, स्वप्नातलं घर घेण्याची संधी; प्रोसेसिंग फी देखील माफ)
या क्षेत्रातील मागणी कमी
या सर्वेक्षणानुसार, ट्रव्हल, विमान कंपन्या, हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि शिक्षणाशी संबंधित लोकांची मागणी अजूनही कमी आहे. या सर्वेक्षणात असेही समोर आले आहे की नोकरीच्या बाबतीत लहान शहरांना अधिक पसंती आहे. चंदीगड, जयपूर यासारख्या शहरांमध्ये नवीन रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. छोट्या शहरांमध्ये नोकरीच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.