नवी दिल्ली, 4 ऑगस्ट : कमी जोखीम आणि भरघोस परतावा यामुळे आता मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य गुंतवणूकदार म्युच्युअल फंडला (Mutual Fund) पसंती देत आहेत. आपली आर्थिक उद्दिष्टं साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध गुंतवणूक (Investment) करताना गुंतवणुकीच्या विविध पर्यायांमध्ये म्युच्युअल फंडाचा समावेश केला जात आहे. त्यातही एसआयपी (SIP) अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे दरमहा थोडी थोडी रक्कम गुंतवण्याचा पर्याय लोकप्रिय झाला आहे. मात्र माहितीच्या अभावामुळे गुंतवणूकदार, विशेषतः नवीन गुंतवणूकदार काही चुका करतात. यामुळे त्यांना तोटाही सहन करावा लागतो किंवा त्यांना अपेक्षित नफा मिळत नाही. अशावेळी ते गुंतवणूकदार म्युच्युअल फंडापासून दूर जातात आणि त्यांचा एक चांगला गुंतवणूक पर्याय कमी होतो.
कमी एनएव्ही म्हणजे स्वस्त फंड असा विचार करू नका -
अनेक छोटे गुंतवणूकदार कमी एनएव्ही म्हणजे नेट अॅसेट व्हॅल्यू (NAV) असल्यास तो म्युच्युअल फंड स्वस्त आहे म्हणून त्यात एसआयपीद्वारे गुंतवणूक करतात आणि त्यातून उच्च परतावा (High Return) मिळेल अशी अपेक्षा करतात. मात्र हे चुकीचे आहे. फंडाची एनएव्ही जास्त किंवा कमी होण्याची अनेक कारणे असतात. उदाहरणार्थ, एखाद्या फंडाची एनएव्ही त्याच्या मालमत्तेच्या व्यवस्थापनाखालील बाजारभावावर अवलंबून असते. कोणत्याही चांगल्या व्यवस्थापनाखालील फंडाची एनएव्ही इतर फंडांपेक्षा वेगाने वाढेल. त्याचप्रमाणे, नवीन फंडाची एनएव्ही जुन्या फंडापेक्षा कमी असेल कारण नवीन फंडाला वाढीसाठी कमी वेळ मिळाला आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी त्याच्या एनएव्हीकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. त्याऐवजी त्यांनी फंडाची कामगिरी बघितली पाहिजे. तसेच, त्याच्या भविष्यातील योजनांचा आढावा घेतला पाहिजे.
वाढीऐवजी लाभांश योजना निवडणं -
अनेक गुंतवणूकदार वाढीच्या योजनेऐवजी म्हणजे ग्रोथ प्लॅनऐवजी (Growth plan) लाभांश योजनेला (Dividend plan) प्राधान्य देतात. जेव्हा म्युच्युअल फंड लाभांश घोषित करेल तेव्हा चांगला लाभ मिळेल अशी त्यांची धारणा असते. मात्र म्युच्युअल फंड्स आपल्या व्यवस्थापनाखाली असलेल्या मालमत्तेतूनच लाभांश देतात. यामुळे एनएव्हीमधून दिलेला लाभांश वजा होतो. तसंच लाभांश हा एनएव्हीवर नाही, तर फंडाच्या दर्शनी मूल्यावर दिला जातो, याची अनेक गुंतवणूकदारांना माहिती नसते. त्यामुळे या पर्यायानं त्यांचे नुकसान होऊ शकते. उदाहरणार्थ, 100 रुपये एनएव्ही असलेल्या फंडाने 30 टक्के लाभांश जाहीर केला असेल, तर गुंतवणूकदारांना लाभांश म्हणून 3 रुपये मिळतील कारण फंडाची दर्शनी किंमत 10 रुपये आहे. एवढेच नाही तर फंडाची एनएव्ही 97 रुपयांवर येईल. तर ग्रोथ प्लॅन म्हणजे वाढीच्या योजनांमध्ये गुंतवणूकदारांना कर सवलतीचेही (Tax Benefit) अनेक लाभ मिळतात.
बाजारात घसरण झाली म्हणून एसआयपी थांबवू नका -
अनेक गुंतवणूकदार शेअर बाजारातील (Share Market) चढ-उतारानुसार गुंतवणूक करतात. जेव्हा बाजारात घसरण होते तेव्हा ते एसआयपी थांबवतात आणि तेजी आल्यावर पुन्हा गुंतवणूक सुरू करतात. हे गुंतवणुकीच्या ‘बाय लो अँड सेल हाय’ (Buy Low and Sale High) या मूलभूत सिद्धांताच्या अगदी विरुद्ध आहे. यामुळे गुंतवणूकदार संपूर्ण गुंतवणूक कालावधीत जमा झालेला नफा एका झटक्यात गमावून बसतात. त्यामुळे शेअर बाजारात घसरण होत असली तरी एसआयपी थांबवू नये.
समतोल साधण्याचा प्रयत्न -
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घडामोडींचा शेअर बाजारावर परिणाम होत असतो. त्यात त्यामुळे चढ -उतार होत असतात. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्याऐवजी बाजारातील चढ-उताराप्रमाणे आपल्या गुंतवणुकीत समतोल साधण्यासाठी प्रयत्न करतात. अनेक गुंतवणूकदार दुसऱ्याचे बघून शेअर्स खरेदी -विक्री करू लागतात. मात्र प्रत्येकाचे आर्थिक ध्येय आणि परिस्थिती वेगळी असल्याने अशी गुंतवणूक हानिकारक ठरू शकते. त्यामुळे संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते. काही लोक फंडाची आधीची कामगिरी पाहून गुंतवणूक करतात. मात्र परतावा बदलत राहतो हे विसरतात. भूतकाळातील कामगिरीवर विसंबून, भविष्यातही तो फंड तसाच परतावा देईल, अशी अपेक्षा केली जाते. परंतु नेहमीच तसे होत नाही. प्रत्येक तिमाहीत फंडाचे मूल्य बदलते. त्यामुळे गुंतवणूकदरांनी फंडाची निवड करण्यापूर्वी इतर निकषही लावणे महत्त्वाचे ठरते.
उद्दिष्टाशिवाय गुंतवणूक -
म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करण्यापूर्वी तुमची आर्थिक उद्दिष्टे (Financial Goals) स्पष्ट असली पाहिजेत. तरच तुम्ही योग्य निधी निवडू शकाल. उद्दिष्ट स्पष्ट नसेल तर चुकीच्या फंडात गुंतवणूक करण्याची शक्यता अधिक असते. बरेच गुंतवणूकदार फंड कसे काम करत आहे, हे समजून घेण्यापूर्वीच गुंतवणूक करण्याची चूक करतात. म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यात थोडी जोखीम असते. इथे परताव्याची हमी नसते. फंडाचे उद्दिष्ट आणि गुंतवणूक आपल्या उद्दिष्टांशी सुसंगत असल्याची खात्री करून मगच गुंतवणूक करणे श्रेयस्कर ठरते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money