मुंबई, 19 जुलै : जीएसटी कौन्सिलने पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांवर 5 टक्के जीएसटी लावल्यानंतर मंगळवारपासून अमूलचे दही, लस्सी, ताक महाग झाले आहे. फ्लेवर्ड दुधाच्या बाटल्यांच्या किमतीही वाढवण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. अशा स्थितीत लवकरच दुधाच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 18 एप्रिलपासून या उत्पादनांवर जीएसटी लागू झाल्यानंतर आजपासून त्यांच्या किमतीतही वाढ होताना दिसत आहे.
मुंबईत अमूलची उत्पादने महागली
अमूलने आता मुंबईत 200 ग्रॅम दही कप 21 रुपयांना केले आहे, जो पूर्वी 20 रुपयांना होता. त्याचप्रमाणे 400 ग्रॅम दहीचा कप आता 42 रुपयांना मिळणार आहे, जो पूर्वी 40 रुपयांना मिळत होता. पाऊचमध्ये मिळणारे 400 ग्रॅम दहीही आता 32 रुपयांना मिळणार, जे आधी 30 रुपयांना मिळत होते. 1 किलोचे पॅकेट आता 65 रुपयांऐवजी 69 रुपयांना मिळणार आहे.
मुंबईत 500 ग्रॅम ताकाचे पॅकेट आता 15 ऐवजी 16 रुपयांना मिळणार आहे, तर 170 मिली लस्सीही आता 1 रुपयांनी महाग झाली आहे. मात्र, 200 ग्रॅम लस्सी 15 रुपयांनाच मिळणार आहे. अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस.सोढी यांनी सांगितलं की, छोट्या पॅकेट्सवर वाढलेल्या किमतीचा तोटा आम्ही स्वतः सहन करू, पण काही उत्पादनांवर जीएसटी वाढल्याने किंमत वाढवावी लागली आहे.
इतर कंपन्याही लवकरच किंमत वाढवतील
जीएसटी लागू झाल्यानंतर अमूलने दरवाढीचा पहिला निर्णय घेतला आहे. लवकरच इतर कंपन्याही त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवतील, असा अंदाज आता बाजारातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. अमूल व्यतिरिक्त आनंदा, पराग, कैलाश, मदर डेअरी, गोपाल आणि मधुसूदन या कंपन्याही दही, मठ्ठा, दूध, पनीर, तूप इत्यादींचा पुरवठा करतात. या कंपन्यांचे दही, ताक आणि लस्सी लवकरच महाग होणार असल्याचे मानले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: GST