Home /News /money /

NPS योजनेतून बाहेर पडणं आता झालं सोपं; पेन्शन फंड प्राधिकरणाने दिला मोठा दिलासा

NPS योजनेतून बाहेर पडणं आता झालं सोपं; पेन्शन फंड प्राधिकरणाने दिला मोठा दिलासा

निवृत्तीवेतन निधी नियंत्रण आणि विकास प्राधिकरणानं (PFRDA) एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. NPS खात्याविषयी सगळी अपडेटेड माहिती इथे वाचा..

नवी दिल्ली, 01 जानेवारी: निवृत्तीवेतन निधी नियंत्रण आणि विकास प्राधिकरणानं म्हणजेच पीएफआरडीएनं (PFRDA- Pension Fund Regulator and Development Authority) ई- एनपीएस धारकांकरता या योजनेतून बाहेर पडण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. या आधी ही सुविधा फक्त ऑफलाइन उपलब्ध होती. ग्राहकांना या योजनेतून बाहेर पडायचे असेल, तर एनपीएस (NPS) खातं इंटर सेक्टर शिफ्टिंगद्वारे ई-एनपीएसमधून बँक पीओपीमध्ये (POP -Point of Presence)शिफ्ट करावं लागतं. विड्रावल फॉर्म्स आवश्यक कागदपत्रांसह व्हॅलीडेशनसाठी बँक पीओपीकडे शिफ्ट करावे लागते. त्यानंतर हे सीआरए एक्झिट प्रोसेसमध्ये पुढे जाते. मात्र आता पीएफआरडीएच्या निर्णयानुसार, ई-एनपीएस ग्राहक ऑनलाइन पद्धतीनं एनपीएसमधून बाहेर पडू शकतील. मुदत संपल्यानंतर आणि मुदतीपूर्वी या योजनेतून बाहेर पडणाऱ्या सर्व ग्राहकांना याचा लाभ घेता येणार आहे. लवकरच ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचं पीएफआरडीएनं म्हटलं आहे. ही प्रक्रिया सध्याच्या ई-एनपीएस प्लॅटफॉर्मप्रमाणेच असेल, ज्याचा वापर एनपीएस खाते उघडण्यासाठी केला जातो. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अर्थात एनपीएस (NPS) जानेवारी 2004मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. 2009मध्ये ही सर्वासाठीच खुली करण्यात आली. यामध्ये कोणीही नोकरी करणारी व्यक्ती आपल्या कार्यकाळातच या पेन्शन खात्यात नियमितपणे काही रक्कम गुंतवू शकते. ती व्यक्ती 60 वर्ष पूर्ण झाल्यावर साठलेली सगळी रक्कम एकावेळी काढू शकते किंवा निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी या रकमेचा वापर करू शकते. एनपीएस योजनेत दोन प्रकारची खाती उघडण्याची सोय आहे. एक टियर-1 हे पेन्शन खातं असतं, तर टियर -2 हे व्हॉलंटरी सेव्हिंग्ज खातं असतं. ज्यांचं टियर 1 खातं आहे, तेच टियर -2 खातं उघडू शकतात. यासाठी ऑफलाइन सेवेचा किंवा NPS पोर्टलचा वापर करता येतो. NPS खाते कसे उघडता येते : -यासाठी ग्राहकांना प्रथम ही सुविधा देणारी (PoP-Point of Presence) बँक किंवा पोस्ट शाखा शोधावी लागेल. -तिथून फॉर्म आणून तो भरून केवायसी कागदपत्रांबरोबर जमा करावा लागेल. -पहिल्यांदा जेव्हा तुम्ही 250 ते 1000 रुपये भरून खातं उघडता तेव्हा जिथं खातं उघडलं आहे, ती बँक किंवा पोस्ट शाखा तुम्हाला एक पीआरएएन (PRAN) म्हणजे स्थायी रिटायरमेंट खाते क्रमांक पाठवेल. -हा खाते क्रमांक आणि पासवर्डच्या सहाय्यानं तुम्ही तुमचं खाते हाताळू शकता. -या प्रक्रियेसाठी 125 रुपये रजिस्ट्रेशन फी भरावी लागेल.ऑनलाइन प्रक्रिया : तुम्ही तुमचे एनपीएस खाते आधार, पॅन कार्ड आणि मोबाईल क्रमांक यांना जोडलेलं असेल तर ऑनलाइन खातं उघडणे सोपं आहे. मोबाईलवर पाठवण्यात आलेल्या ओटीपीच्या साहाय्यानं रजिस्ट्रेशन करू शकता. या नंतर तुम्हाला खाते क्रमांक मिळेल. ज्याच्या आधारे तुम्ही एनपीएस खातं वापरू शकता.
First published:

पुढील बातम्या