SBIच्या ग्राहकांना सावधानतेचा इशारा, 'हा' मेसेज आला असेल तर घ्या काळजी
स्टेट बँकेच्या ग्राहकांना सध्या रिवॉर्ड पाईट्सचा मेसेज येत आहे. ज्यामुळे ग्राहकांच्या खात्यातून पैसै लंपास होत आहेत. अशा मेसेजपासून सावध राहण्यासाठी नेमकं काय करावं ते जाणून घ्या

SBI बँक नेहमीच ग्राहकांना उत्तम सुविधा देण्यासाठी आणि त्यांच्या पैशांना सुरक्षित ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. म्हणूनच बँक ग्राहकांना SMSद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा देत आहे. रिवॉर्ड पॉईंटच्या नावावर लोकांच्या क्रेडिट कार्डची माहिती मिळवून काही हॅकर्स गंडा घालत आहेत.

रिवॉर्ड पॉईंटच्या नावावर गिफ्ट वाऊचर देणाऱ्यांपासून सावधान राहण्याचा इशारा बँकेनं मेसेजद्वारे ग्राहकांना दिला आहे. बँकेच्या मते ग्राहकांनी आपल्या क्रेडिट कार्डची माहिती कोणालाही देऊ नये तसेच OTP शेअर करू नये.

दिल्लीमध्ये एका व्यक्तीकडून असा मेसेजद्वारे त्याच्या डेबिट कार्डाची माहिती मागवण्यात आली. विशेष म्हणजे या मेसेजमध्ये त्याच्या डेबिट कार्डचा नंबर आधीच नमुद केला होता. त्या व्यक्तीनं बँकेचा मेसेज असल्याचं समजून खात्याची सर्व माहिती त्यामध्ये नमुद केली. सर्व माहिती नमुद करताच त्या व्यक्तीच्या अकाऊंटमधून पैसे लंपास केले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हॅकर्स ई-मेल हॅक करून OTP क्रमांक मिळवतात आणि ग्राहकांना गंडा घालतात.

बँकेचा अधिकारी मेसेज किंवा फोन करून ग्राहकांकडून खात्याची माहिती कधीच मागत नाही असं स्टेट बँकेचं म्हणणं आहे. त्यामुळे ग्राहकांना अशा मेसेजपासून स्वत: सावध राहिलं पाहिजे. जर तुमच्यासोबत अशी फसवणुक झाली तर लगेचच पोलिसांत तक्रार दाखल करावी किंवा बँकेच्या वेबसाईटवर असलेल्या क्रमांकावर संपर्क साधून बँकेला त्वरित याबाबत कळवावे.
First Published: Jan 5, 2019 06:10 PM IST