मुंबई, 21 मार्च : आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचा सर्वात जास्त वाटा आहे. आजही आपल्या देशात लाखो शेतकरी आहेत. मात्र, त्यांच्यापैकी अनेकजण अजूनही पारंपरिक पद्धतीनं शेती करतात. त्यामुळे त्यांना म्हणावा असा, नफा मिळत नाही. हीच बाब लक्षात घेऊन आंध्र प्रदेशातील एका 21 वर्षांच्या तरुणानं अॅग्रो-फार्मिंग सेन्सर प्रणाली विकसित केली आहे.
काय आहे प्रणाली?
ही प्रणाली जमिनीचं तापमान, आर्द्रता आणि हवेचं तापमान ओळखू शकते आणि त्यानुसार आपोआप पिकांना पाणी देऊ शकते. उदय दुर्गा प्रसाद असं या तरुणाचं नाव असून तो आचार्य नागार्जुन विद्यापीठातील बी. टेक तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे. उदय मूळचा श्रीकाकुलम जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील रहिवासी आहे. 'द न्यू इंडियन एक्सप्रेस'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
गावातील शेतांना दिलेल्या भेटीदरम्यान उदयनं पाहिलं की, बहुतांश शेतकर्यांना पिकासाठी किती पाणी लागतं याची माहितीच नाही. शेतात पाणी साचून राहिल्यामुळे पिकाच्या वाढीवर विपरित परिणाम होतो, हे उदयच्या लक्षात आलं. या शिवाय, त्याला इतरही काही समस्या लक्षात आल्या. त्यामुळे त्यानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काहीतरी टेक्नॉलॉजी तयार करण्याचा निर्णय घेतला.
सांगली जिल्ह्यातील 'या' भागात चक्क हवेवर पिकवला जातो गहू! पाहा काय आहे प्रकार, Video
उदय म्हणाला, "माझ्या गावातील बहुतेक लोक चरितार्थासाठी शेतीवर अवलंबून आहेत. आपल्या देशात स्मार्ट शेतीचा पर्याय उपलब्ध होऊन आता एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, माझ्या गावातील शेतकरी या तंत्रापासून अद्याप दूरच आहेत. ते आजही पारंपरिक पद्धतीनं शेती करतात. त्यामुळे त्यांच्या पीक उत्पादकतेवर आणि नफ्यावर परिणाम होतो. जेव्हा मला या समस्येचं निराकरण करण्याची संधी मिळाली तेव्हा मी त्यावर उपाय शोधण्याचा आणि माझ्या गावकऱ्यांना मदत करू शकेल असं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला."
उदयनं सांगितलं की, पिकाला जास्त पाणी दिल्यास उत्पादनात घट होऊ शकते. हा मुद्दा लक्षात घेऊन त्यानं हवामानाच्या घटकांवर आधारित पिकांसाठी किती पाणी लागतं याचा मागोवा घेण्याचं ठरविलं. उदयनं त्याचे तीन वर्गमित्र राजेश, रवितेजा आणि ज्योत्स्ना यांच्यासह मिळून या प्रकल्पावर काम केलं. डिजिटल तापमान आणि ह्युमिडिटी (डीएचटी) लेव्हल सेन्सरच्या मदतीनं, ते तापमान आणि आर्द्रता ओळखण्यात यशस्वी झाले. बीएमपी280 सेन्सर आणि मॉइश्चर सेन्सरनं पिकाला आवश्यक पाणी पुरवठा करण्यासाठी प्रेशर अॅप्टिट्युड रेग्युलराईज केलं.
दुष्काळी खानापुरात स्ट्रॉबेरीची शेती, पाहा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग, Photos
प्रोजेक्टमधील तंत्रज्ञान स्पष्ट करताना उदयनं सांगितलं की, इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये Arduino इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायर्नमेंट (आयडीई) विकसित करून सर्व सेन्सर्स जोडलेले आहेत. जमिनीचा सुपीकता दर, त्यातील पोषक द्रव्ये, पाण्याची शोषण क्षमता, पीक योग्यता आणि इतर मापदंड मोजण्यासाठी सॉलिड टेस्ट घेतली जाते.
"मातीचा प्रकार आणि चाचणी अहवालांचा अभ्यास करून आम्ही ठराविक कालावधीत पिकासाठी लागणारं पाणी आणि पोषकतत्त्वांची गणना करतो. या सेन्सरद्वारे डेटा गोळा केला जाऊ शकतो आणि त्यानुसार पिकाला पाणी व इतर पोषकतत्त्वं दिली जातात. ही प्रणाली पिकाच्या वाढीचाही मागोवा घेते. जेणेकरून शेतकरी इतर समस्या ओळखू शकतात आणि आवश्यक उपाय योजना करू शकतात. असं झाल्यास शेतकरी अधिक नफा मिळवू शकेल," असं उदय म्हणाला.
आचार्य नागार्जुन युनिव्हर्सिटीमध्ये भरलेल्या शैक्षणिक प्रदर्शनादरम्यान उदयच्या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या त्यांची टीम हे उपकरण कमी खर्चात जास्तीत जास्त प्रभावी बनवण्यासाठी काम करत आहे. " शेतकऱ्यांना मदत करण्याचा आमचा हेतू आहे. त्यामुळे आम्ही खर्च कमी करण्यासाठी आणि वापरण्यासाठी ते अधिक अनुकूल बनविण्यासाठी काम करत आहोत. जेणेकरून अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल," असंही उदय म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Andhra pradesh, Farmer