नवी दिल्ली 14 डिसेंबर : सध्या डिजिटल पेमेंटचा (Digital Payment) मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. अगदी चहाच्या टपरीपासून ते फेरीवाल्यांपर्यंत सर्वजण डिजिटल पद्धतीनं व्यवहार करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे एटीएम कार्ड (ATM Card), क्रेडिट कार्ड (Credit Cards) अशा कार्ड्सना अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे. देशातील बहुतेक बँका आपल्या ग्राहकांना चांगल्या क्रेडिट स्कोअरसह क्रेडिट कार्डची सुविधा देतात. हे क्रेडिट कार्ड घेण्याची प्रक्रियाही खूप सोपी करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येनं क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत.
कोरोनाच्या काळात तर डिजिटल व्यवहारांनी (Digital Transactions) एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या काळात डिजिटल पेमेंट अॅप्सनं (Digital Payment Apps) क्रेडिट कार्डद्वारे घरभाडं भरण्याची (Rent with Credit Cards) सुविधा सुरू केली. आज आपण क्रेडिट कार्डनं घरभाडं भरण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत ते जाणून घेऊया...
राज्यात या शहरात मिळतंय सर्वात महाग पेट्रोल, मुंबई-पुण्यात दर 109 रुपयांवर
क्रेडिट कार्डनं घर भाडं भरण्याचे फायदे
क्रेडिट कार्डद्वारे भाडं भरल्यास ग्राहकांना विविध प्रकारची बक्षीसं मिळतात. जर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे भाडं भरत असाल तर तुम्हाला 45 दिवसांचा कालावधी मिळतो. वरील 15 दिवसांच्या कालावधीसाठी कोणतंही व्याज भरावं लागत नाही. याशिवाय बँकेतील ठेवींवर तुम्हाला व्याज मिळत राहतं. तसंच, तुम्ही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डांवर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत खर्च केल्यानंतर तुमचं वार्षिक देखभाल शुल्क (Maintenance fees) परत केलं जातं. जर तुम्ही क्रेडिट कार्डनं भाडं भरत असाल तर तुम्हाला या सर्व सुविधांचा नक्कीच फायदा मिळू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रेडिट कार्डनं भाडे भरल्यास अनेकदा कॅशबॅकही (Cashback) मिळतो.
क्रेडिट कार्डनं भाडं भरण्याचे तोटे
क्रेडिट कार्डने घराचं, फ्लॅटचं किंवा दुकानाचं भाडं भरण्यासाठी दोन टक्क्यांपर्यंत वाढीव शुल्क भरावं लागेल. सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास, जर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे 10 हजार रुपये भाडं भरलं असेल, तर तुम्हाला त्यासाठी 200 रुपयांपर्यंत अधिक शुल्क भरावं लागू शकतं. याउलट, जर तुम्ही भाड्याची रक्कम रोख भरली किंवा ऑनलाईन ट्रान्सफर (Online transfer) केली तर तुम्हाला कोणतंही शुल्क भरावं लागत नाही.
कोण किती शुल्क घेतं?
क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यासाठी क्रेड (Cred) अॅप 1.5 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त शुल्क आकारतं. जर तुम्ही हाउसिंगच्या माध्यमातून भाडं भरल्यास तुम्हाला 1.3 टक्क्यांपर्यंत शुल्क भरावं लागेल. आता पेटीएमनंही (Paytm) क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्याची सुविधा सुरू केली आहे मात्र, हे डिजिटल पेमेंट अॅपही त्यासाठी 1 टक्के शुल्क आकारतं.
क्रेडिट कार्डचा वापर केल्यास घरभाडं देताना तुम्हाला फायदा होऊ शकतो. मात्र, त्यासाठी सर्व अटी आणि शर्ती काळजीपूर्वक पाहाव्या लागतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Credit card, Online payments