नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : ग्लोबल प्रोफेशनल कंपनी अॅक्सेंचरमध्ये जगभरातील 5 लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. आणि आता त्यांनी चांगला परफॉमन्स नसणाऱ्या कमीत कमी 5 टक्के कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे हजारो भारतीयांनाही आर्थिक मंदीमुळे नोकरी गमवावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियन फिनान्शिअल रिव्ह्यू (AFR) मध्ये आलेल्या एका रिपोर्टने सर्वात आधी याबाबत माहिती दिली. या रिपोर्टमध्ये ऑगस्टच्या मध्यात अॅक्सेंचरच्या सीईओ जुली स्वीटद्वारा घेतलेल्या एका अंतर्गत कर्मचारी बैठकीचा हवाला देत ही माहिती दिली. भारतात अॅक्सेंचरचे साधारण 2 लाख कर्मचारी आहेत.
कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना याचा फटका सहन करावा लागणार आहे. अॅक्सेंचरने आयएएनएसला सांगितले की, सद्यपरिस्थितीत कंपनी अतिरिक्त ग्लोबल वर्कफोर्स अॅक्शनची योजना तयार करीत नाही. ते पुढे म्हणाले की, प्रत्येक वर्षी आम्ही परफॉमन्सच्या पातळीवर आमच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करतो. यामध्ये त्यांच्या परफ़ॉमन्सबरोबरच त्यांच्या प्रगतीची क्षमता, कोणत्या भागात सुधारणा घडवून आणली जाऊ शकते, ते कंपनीसोबत दीर्घकाळ काम करण्यासाठी योग्य आहे का? या विषयांवर चर्चा करतो.
हे वाचा-नेटफ्लिक्सवरील वेबसीरिजमुळे मेहुल चोक्सी अस्वस्थ; प्री-स्क्रिनिंगची केली मागणी
कंपनीने सांगितले की, या वर्षी आमच्या व्यवसायातील सर्व भाग आणि करिअरच्या सर्व स्तरांवर आम्ही चांगली कामगिरी न करणाऱ्या 5 टक्के कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करीत आहोत. या कर्मचाऱ्यांना अॅक्सेंचरमधून बाहेर जावे लागेल. प्रत्येक वर्षी अशा स्वरुपाचा प्रक्रिया राबवली जाते, असेही त्यांनी सांगितले.