Home /News /money /

कोरोना काळात आर्थिक संकटाचा सामना करताय? या चार मार्गांनी करू शकता कमाई

कोरोना काळात आर्थिक संकटाचा सामना करताय? या चार मार्गांनी करू शकता कमाई

या चार मार्गांनी तुम्ही घरबसल्या नोकरी, व्यवसाय न करता चांगली कमाई करू शकता.

नवी दिल्ली, 25 मे: कोरोना संकटाच्या काळात सध्या अनेकजण आर्थिक संकटाला तोंड देत आहेत. तुम्हालाही आर्थिक तंगी जाणवत असेल तर काळजी करू नका. या चार मार्गांनी तुम्ही घरबसल्या नोकरी, व्यवसाय न करता चांगली कमाई करू शकता. शेअर्स आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक - शेअर्स (Stocks), रोखे (Bonds) आणि म्युच्युअल फंडातील (Mutual Funds) गुंतवणूक दीर्घकालीन आर्थिक समस्यांवर मात करण्यास मदत करते. पण यातील गुंतवणूकीची (Investment) विक्री न करताही रोख रक्कम मिळवता येते. बहुतेक बँका ग्राहकांना म्युच्युअल फंड, शेअर्स आणि बॉन्ड यातील त्यांची गुंतवणूक तारण ठेवून एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज (Loan) देतात. तर बिगर बँकिंग वित्तीय संस्था अर्थात एनबीएफसी (NBFC) 20 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देऊ शकतात. किमान कर्जाची रक्कम 50 हजार रुपयांपासून सुरू होते. कर्जाची रक्कम तारण ठेवलेल्या मालमत्तेच्या 50 ते 80 टक्के इतकी असते. जागा भाड्याने देऊन पैसे मिळवा - ई-कॉमर्स कंपन्यांना (E-Commerce Companies) आपलं घर भाड्यानं देऊन (rent) तुम्ही पैसे मिळवू शकतात. आजकाल बऱ्याच ई-कॉमर्स कंपन्या स्थानिक उद्योजकांसाठी अशा योजना आणत असतात, त्यामध्ये तुम्ही घर भाड्याने देऊन लाखो रुपये कमवू शकता. 250 चौरस फूट किंवा त्याहूनही कमी आकाराच्या जागेसाठीही चांगलं भाडं मिळतं. तसंच आपल्या जागेच्या 2 ते 4 किलोमीटरच्या परिघातील ग्राहकांना उत्पादनं वितरीत करण्यातूनही कमाई करता येते. दररोज 20 ते 30 पॅकेज वितरित केल्यास दरमहा 18 ते 20 हजार रुपये मिळू शकतात.

(वाचा - तीन मित्रांची कहाणी, वर्षभरात झाले 100 कोटीचे मालक; काय आहे भन्नाट Start-Up Idea)

कारपासूनही मिळवा उत्पन्न - आर्थिक संकटांमुळे तुम्ही तुमची कार (Car) विकायचा विचार करत असाल, तर त्याची गरज नाही. कार न विकता तुम्ही तिचा वापर करून पैसे कमवू शकता. कारच्या बदल्यात कर्ज घेऊन तुम्ही तुमची आर्थिक गरजा भागवू शकता. साधारणत: एक लाख रुपये कर्ज मिळू शकते. काही बँका कर्ज म्हणून कारच्या मूळ किंमतीच्या 50 टक्क्यांपर्यंतही कर्ज देतात. यासाठी कागदपत्रंही कमी लागतात त्यामुळं कर्ज सहज मिळतं. जीवन विम्याचाही आधार - स्वस्त व्याजदरानं कर्ज घ्यायचं असेल, तर पीपीएफ (PPF), जीवन विमा पॉलिसीचा (Life Insurance Policy) वापर करा. पीपीएफ खातं उघडल्यानंतर तुम्हाला तिसर्‍या वर्षापासून आणि सहाव्या वर्षापर्यंत कर्ज मिळू शकतं. व्यक्तीच्या नावे जितक्या रकमेची जीवन विमा पॉलिसी आहे त्यांच्या तुलनेत कर्ज दिलं जातं. पॉलिसीचं रोख मूल्य पुरेसं असल्यास, 1 ते 5 कोटी रुपयांपर्यंतही कर्ज मिळतं. सामान्यत: पॉलिसीधारकांना पॉलिसीच्या मूल्याच्या 80 ते 90 टक्के इतकं कर्ज मिळू शकतं. हे कर्ज 3 ते 5 दिवसांत मिळू शकतं.
First published:

Tags: Small business, Small investment business

पुढील बातम्या