एखाद्या उद्योगपतीची मुलगी किंवा नात असलेल्या मुलीला असंख्य भेटवस्तू मिळत असल्याचं तुम्ही बघितलं असेल. व्यावहारिक जगात ही गोष्ट पूर्णपणे खरी आहे; पण या जगात एक अशी शक्ती आहे जिच्यापुढे प्रत्येक जण नतमस्तक होतो. ज्याला आपण देव म्हणतो. तो कोणाचा खिसा कधी भरेल हे सांगता येत नाही. कॅनडातले एक वृद्ध आजोबा आणि त्यांच्या 18 वर्षांच्या नातीबाबत ही गोष्ट घडली आहे. क्षणार्धात कोट्यवधी रुपयांची भेट मिळाल्याने नात आणि आजोबा दोघेही आश्चर्यचकित झाले आहेत. डॉक्टर बनण्याचं स्वप्न असलेल्या नातीचा 18वा वाढदिवस संस्मरणीय ठरला आहे. संपूर्ण कुटुंबाचं जीवनच बदललं आहे.
या कथेची मुख्य पात्र असलेल्या ज्युलिएट लॅमरसाठी 7 जानेवारीच्या दिवसाची सुरुवात थोडी वेगळी झाली. या दिवशी तिचा वाढदिवस असतो. ती कॅनडातल्या ओंटारियोमधली रहिवासी आहे. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी ती थोडी मस्तीच्या मूडमध्ये होती. तिच्या आजोबांनी तिला एक सल्ला दिला, ज्यामुळे तिचं आयुष्य बदलून गेलं आहे. ज्युलिएट मस्तीच्या मूडमध्ये एका सुपर स्टोअरमध्ये जाते. तिथे काय विकत घ्यावं हे तिला समजत नाही. मग तिचे आजोबा तिला लॉटरीची तिकिटं घेण्याचा सल्ला देतात. ती आयुष्यात पहिल्यांदाच लॉटरीची तिकिटं घेणार होती त्यामुळे ती कशी खरेदी करावीत, हे तिला समजलं नाही. तिनं तिच्या वडिलांना कॉल करून लॉटरीची तिकिटं कशी खरेदी करायची याबाबत विचारलं. मग तिनं वडिलांच्या सल्ल्यानं 'ओंटारियो लॉटरी आणि गेमिंग कॉर्पोरेशन लॉटरी'ची तिकिटं खरेदी केली. तिनं लोट्टो 6-49 लॉटरी घेतली आणि घरी परतली. आपल्याकडे लॉटरीची तिकिटं असल्याचा तिला विसर पडला होता. एके दिवशी तिला बातमी दिसते, की तिच्या भागातल्या कोणी तरी 7 जानेवारीचा ड्रॉ जिंकला आहे. तेव्हा तिच्या लक्षात येतं, की आपल्याकडेही तिकिटं आहेत.
आतापर्यंतची सर्वात मोठी रियल एस्टेट डील, 23 घरांची किंमत जाणून व्हाल अवाक्
मोबाइल अॅपवरही तिने आपली लॉटरीची तिकिटं तपासली असता मोबाइलवरचा मेसेज पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिनं 48 दशलक्ष कॅनेडियन डॉलर्स जिंकले होते. ही रक्कम यूएस डॉलरमध्ये 35 दशलक्ष आणि रुपयांमध्ये 2.9 अब्ज रुपयांपेक्षा जास्त होते. गंमत म्हणजे त्या वेळी ती ऑफिसमध्ये होती. तिला मिळालेली रक्कम बघून तिच्या सहकाऱ्यांनाही आश्चर्य वाटलं. या विजयानंतर तिच्या ऑफिसनं तिला लवकर घरी जाण्याचा सल्ला दिला होता; पण तिच्या आईने तिला शिफ्ट पूर्ण केल्यानंतरच घरी येण्यास सांगितलं.
आता FD वर मिळेल जास्त व्याजदर, 'या' बँकेने वाढवले FD Rates =
2.9 अब्ज रुपयांच्या रकमेचा अंदाज लावणं कठिण आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, या रकमेतून, ज्युलिएट तिच्या कुटुंबासाठी पाच सर्वांत महागड्या मर्सिडीज कार, एक चार्टर्ड विमान, लंडन किंवा न्यूयॉर्कमध्ये एक बंगला खरेदी करू शकते आणि पुढच्या आयुष्यासाठी 150 कोटी रुपये वाचवू शकते. टॉप-एंड मर्सिडीज कारची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे. मध्यम आकाराच्या चार्टर्ड विमानाची किंमत सुमारे 100 कोटी रुपये आहे. याशिवाय बंगल्यावर 40 कोटी रुपये खर्च करूनही ज्युलिएटला आयुष्य जगण्यासाठी 150 कोटी रुपये शिल्लक राहणार आहेत.
ज्युलिएट खूप हुशार आणि समजदार वाटते. वडिलांच्या मदतीनं या रकमेची गुंतवणूक करणार असल्याचं तिनं ग्लोबल न्यूजशी बोलताना सांगितलं. यासोबतच ती आपला अभ्यास सुरू ठेवेल आणि डॉक्टर बनेल. यानंतर तिला कुटुंबासोबत जग फिरायचं आहे. तिला जगाच्या कानाकोपऱ्यातल्या भाषा, खाद्यपदार्थ, जीवनशैली अशा गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. ज्युलिएटच्या वडिलांचं म्हणणं आहे की, मुलीला डॉक्टर व्हायचं आहे. त्यासाठी आता पैशांची कमतरता भासणार नाही आणि शैक्षणिक कर्जही घ्यावं लागणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lokmat news 18