संदीप राजगोळकर
कोल्हापूर, २८ मार्च : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यावेळीही हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मागच्या निवडणुकीत ते याच मतदारसंघातून भाजपचा मित्रपक्ष म्हणून लढले होते. आता मात्र त्यांनी भाजपची साथ सोडत आघाडीची गाडी पकडली आहे.
राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमधला दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी यात्रा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. अर्ज भरण्यासाठी ते शेतकरी आणि कार्यकर्त्यांसोबत बैलगाडीतून गेले. यावेळी त्यांच्या बैलगाडीत योगेंद्र यादव हेही होते.
योगेंद्र यादव यांनी स्वराज अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आवाज दिला आहे. त्यामुळेच राजू शेट्टींना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी या यात्रेत हजेरी लावली.
राजू शेट्टी आणि योगेंद्र यादव यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. याआधी राजू शेट्टींनी भरवलेल्या ऊस परिषदेसाठीही ते जयसिंगपूरला आले होते. त्याचबरोबर राजू शेट्टींनी शेतकऱ्यांसाठी देशभरात जी आंदोलनं केली त्या आंदोलनातही योगेंद्र यादव यांचा सक्रिय सहभाग होता.
नरेंद्र मोदी हे आतून घाबरलेले आहेत, निकालाच्या दिवसापर्यंत हे सरकार काहीही करू शकतं, अशी टीका यावेळी योगेंद्र यादव यांनी केली.
हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत. यावेळी शेट्टी यांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेतेही आले होते.
राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे सतेज पाटील हे नेतेही यानिमित्ताने एकत्र दिसले. हे दोघंजण एकमेकांचे कट्टर विरोधक असल्याचं बोललं जातं पण या दोघांनीही राजू शेट्टी यांना पाठिंबा देत आघाडीचा धर्म पाळला आहे.हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी पुन्हा विजयी होण्याची शक्यता आहे. पण कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक विरुद्ध शिवसेनेचे संजय मंडलिक अशी लढत आहे.तिथे सतेज पाटील हे शिवसेनेला मदत करतायत, असा आरोप होतोय. आघाडीतल्या या दोन नेत्यांच्या भांडणात शिवसेनेचा फायदा होणार का, अशी इथे चर्चा आहे.
=====================================================================================================================================
VIDEO : किरीट सोमय्यांचं काय होणार? मातोश्री भेटीनंतर भाजपचे प्रसाद लाड म्हणतात...
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा