शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी नरेंद्र मोदींना आग्रह करणार - शरद पवार

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं पानीपत झालं. यानंतरही पवारांचा दौरा थांबलेला नाही.

News18 Lokmat | Updated On: May 26, 2019 04:17 PM IST

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी नरेंद्र मोदींना आग्रह करणार - शरद पवार

इंदापूर 26 मे : लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दृष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर रवाना झाले. निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं पानीपत झालं. यानंतरही पवारांचा दौरा थांबलेला नाही. रविवारी त्यांनी इंदापूर भागातल्या दुष्काळग्रस्त गावांना भेटी दिल्या. शेतकऱ्यांच्या सरसकट माफीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी आज इंदापूर भागातल्या काही गावांना भेटी दिल्या आणि दुष्काळी परिस्थितीवर शेतकऱ्यांशी चर्चा केली. पवार म्हणाले, दुष्काळाची स्थिती कठिण आहे. शेतकरी संकटात आहे. यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी भेटणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं ते म्हणाले.

केंद्रात सध्या काळजीवाहू सरकार आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारचा शपथविधी झाला की पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना सरसकट कर्जमाफीसाठी आग्रह धरणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शरद पवारांनी पराभवानंतरही आपले दौरे सुरूच ठेवले आहेत. या दौऱ्यातून कार्यकर्त्यांना बळ देण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे.

शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातही नमो नमो

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून ओळख असणाऱ्या विदर्भातही जनतेनं पुन्हा एकदा भाजप-युतीच्या उमेदवारांना आपला कौल दिला आहे. विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आपलं मत भाजपच्या उमेदवारांना देऊन त्यांचं पारडंच वजनदार केलं आहे. विदर्भातील दहा पैकी आठ जागांवर युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. यावरून विदर्भातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारलाच आपली पसंती दर्शवल्याचं दिसत आहे.

Loading...

लोकसभा निवडणूक 2014 मध्ये भाजपनं शेतकऱ्यांना भरघोस आश्वासनं देत केंद्रात बहुमतात सत्ता मिळवली होती. पण सत्तेच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारकडून निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांसाठीच ठोस अशा उपाययोजना राबवण्यात आल्या नाहीत, मोदी सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे, असा थेट आरोप शेतकरी तसंच विरोधकांकडून करण्यात आला. परिणामी, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, कर्जमाफी यांसह आपल्या अन्य हक्कांसाठी राज्यासहीत देशभरातल्या शेतकऱ्यांनीही तीव्र स्वरूपात आंदोलनं छेडली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2019 04:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...