कोण आहेत युतीचे खरे शिल्पकार आणि मारेकरी?

कोण आहेत युतीचे खरे शिल्पकार आणि मारेकरी?

युतीची गाडी पुन्हा रुळावर आणण्यात सर्वात मोठी भूमिका बजावली ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर शिवसेनेच्या तोफखाण्याचे प्रमुख होते खासदार संजय राऊत.

  • Share this:

मुंबई 18 फेब्रुवारी :  उद्धव ठाकरेचा स्वबळाचा नारा, भाजप आणि शिवसेनेत निर्माण झालेली कमालीची कटुता. दोनही पक्षांच आपापल्या भूमिकेवर ठाम असणं, 'सामना'तून दररोज होणारे प्रखर हल्ले असं वातावरण असताना अखेर युती झाली आणि दोनही पक्षांच्या आमदार खासदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. युतीची गाडी पुन्हा रुळावर आणण्यात सर्वात मोठी भूमिका बजावली ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर शिवसेनेच्या तोफखाण्याचे प्रमुख होते खासदार संजय राऊत.


शिवसेना सत्तेत झाल्यानंतरही शिवसेनेचे भाजपवरचे प्रहार काही कमी होत नव्हते. संजय राऊत सामनातून दररोज भाजपवर तोफेंचे जहाल प्रहार करत होते. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस असं कुणालाच त्यांनी सोडलं नाही. विरोधीपक्षांनीही केली नसेल तेवढी टीका सामनाच्या अग्रलेखातून होत होती.


आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो अशा घोषणा सेना नेत्यांनी केल्या होत्या. फडणवीस सरकारचा मृत्यू अटळ आहे. फक्त वेळ निवडायची बाकी आहे असंही संजय राऊत यांनी सांगितलं होतं. राम मंदिराच्या मुद्यावर तर उद्धव  ठाकरेंनी थेट अयोद्धेत धडक दिली होती. उद्धव ठाकरेही पंतप्रधानांवर सडकून टीका करत होते. त्यामुळे वातावरण जास्त चिघळलं होतं.


असं असताना भाजपकडून फारसा प्रतिकार होत नव्हता. कधीतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अप्रत्यक्षपणे आम्हा काही फरक पडत नाही असं सांगायचे, तर आशीष शेलार शिवसेनेला अंगावर घ्यायचे. मात्र मुख्यमंत्र्यांनी कधीही संयम सोडला नाही. त्यांची आणि उद्धव ठाकरेंची व्यक्तिगत केमेस्ट्री उत्तम होती. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांच्यातलं सौहार्द कायम दिसून येत होतं.


बाळासाहेबांच्या स्मारकाच्या गणेशपुजन कार्यक्रमामध्ये तर ही केमेस्ट्री जास्तच ठळकपणे दिसून आली. काहीही झालं तरी युती होणारच असं मुख्यमंत्री ठामपणे सांगत होते. आमचं शिवसेनेवर खुलं तर शिवसेनेचं छुपं प्रेम आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री युतीबाबत कायम आशावादी होते.


आधीच्या काळात प्रमोद महाजनांनी जी भूमिका निभावली ती भूमिका यावेळी देवेंद्र फडणवीसांनी साकारली. उद्धव ठाकरेंनाही मुख्यमंत्र्यांबद्दल आदर आणि विश्वास होता. नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा विश्वास असल्याने मुख्यमंत्रीही शिवसेनेला आत्मविश्वासाने सामोरे जात होते.


सर्व मतभेद मान्य करुनही युती होण्यातच भाजप आणि शिवसेनेचा फायदा आहे हे मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना पटवून देण्यात यश मिळवलं. बदलती परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेना दूर जाणं हे भाजपला परवडणारं नव्हतं. तर स्वबळवर लढलं तर काय होणार याची शिवसेनेलाही पूर्ण जाणीव होती. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच युतीचे मुख्य शिल्पकार ठरले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2019 08:46 PM IST

ताज्या बातम्या