Analysis : महाराष्ट्रातील राजकारण 'बिहार''च्या वाटेवर?

Analysis : महाराष्ट्रातील राजकारण 'बिहार''च्या वाटेवर?

सध्या शिवसेना - भाजपमधील जागा वाटपाची बोलणी पाहता राज्यातील राजकारण बिहारच्या वाटेवर आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 12 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना सर्वांच्या मुखी एकच चर्चा ऐकायला मिळत आहे. शिवसेना – भाजप युतीचं काय? युती होणार कि स्वबळावर लढणार? कोण जिंकणार सर्वाधिक जागा? अशातच शिवसेनेनं भाजपसमोर 1995च्या फॉर्म्युल्यानुसार चालण्याचा आग्रह धरल्यानं भाजप शिवसेनेसमोर नमते घेणार का? अशी चर्चा सध्या दिवसभर रंगताना दिसत आहे. या साऱ्या घडामोडींकडे पाहिल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण देखील 'बिहार'च्या वाटेवर आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काय झालं बिहारमध्ये?

कारण, बिहारमध्ये देखील लोकसभेच्या जागा वाटप करताना भाजपनं जदयू समोर अर्थात नितीश कुमार यांच्यापुढे नमतं घेतलं. नव्या फॉर्म्युल्यानुसार लोकसभेच्या एकूण 40 जागांपैकी जदयू 17, भाजप 17 आणि रामविलास पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी 6 जागा लढवेल असा फॉर्म्युला ठरला. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला 22, लोकजशक्ती पार्टीला 6 आणि भाजपविरोधात लढणाऱ्या जदयूला केवळ 2 जागा जिंकता आल्या होत्या.

पण, बिहारमधील नितीश कुमार यांचं वाढतं महत्त्व लक्षात घेता भाजपनं नितीश कुमार यांच्यासमोर नमतं घेतल्याचं चित्र पाहायाला मिळालं. त्यामुळे शिवसेनेना ताठर भूमिका घेत नितीश कुमार यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतंय. त्यामुळे भाजप देखील 'चक्रव्युहात' अडकल्याचं पाहायाला मिळत आहे.

मित्र पक्षांची नाराजी भाजपला परवडेल?

भाजप त्याहीपेक्षा नरेंद्र मोदी – अमित शहा जोडीवर टीका करत मित्रपक्षांनी आपली नाराजी उघड केली आहे. चंद्रबाबु नायडू अर्थात टीडीपीनं भाजपचा पाठिंबा काढत एनडीएतून बाहेर काढत 'सवता सुभा' मांडला. शिवाय, विशेष राज्याच्या मुद्यावरून पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारविरोधात अविश्वास ठराव देखील मांडला.

दुसरीकडे शिवसेनेनं देखील भाजपविरोधातील टीकेचा सूर आणखी 'तीव्र' केला असून संधी मिळेल त्या ठिकाणी शिवसेना भाजपवर टीकास्त्र डागत आहे. सध्या देशातील राजकीय वातावरण पाहता मित्र पक्षांची नाराजी भाजपला परवडेल का? हा देखील गहण मुद्दा आहे.

अमित शहांचा निर्वाणीचा इशारा

यापूर्वी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मित्र पक्षांना 'याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्याशिवाय' असा थेट इशारा दिला होता. शिवाय, पुणे दौऱ्यादरम्यान शहा यांनी शरद पवार यांना थेट लक्ष्य केलं.

दरम्यान, 'मिशन बारामती'ची हाक देत राज्यात 45 जागा जिंकण्याचा निर्धार शहांनी बोलून दाखवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शहा यांच्या सुरात सुर मिसळत शिवसेना आणि शरद पवारांना आव्हान दिलं. पण, अशा स्थितीमध्ये देखील भाजप नेतृत्व शिवसेनेसोबत युतीची बोलणी करत आहे. त्याला शिवसेनेकडून अद्याप देखील प्रतिसाद मिळत नसून सेना 1995च्या फॉर्म्युल्यावर अडून बसली आहे.

काय आहे 1995चा फॉर्म्युला ?

शिवसेनेला 1995 प्रमाणे जागा हव्य़ा आहेत. त्यावेळी विधानसभेसाठी शिवसेनेने 169 तर भाजपने 116 जागा लढवल्या होत्या. तेव्हा दोन्ही पक्षांनी 138 जागा जिंकून राज्यात पहिले युतीचे सरकार स्थापन केले होते. त्या सूत्रानुसार युती सरकार आल्यास मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल. मात्र 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वतंत्र निवडणू्क लढवली आणि सेनेपेक्षा अधिक जागा मिळवल्या. त्यामुळे आता विधानसभेत 122 संख्या बळ असणारा भाजप 1995च्या सूत्रानुसार 116 जागा लढवणार का, हा मोठा प्रश्न आहे.

राज्यात मोठा भाऊ नेहमी शिवसेनेच असेल ही भूमिका शिवसेनेने आधीपासून मांडली आहे. या भूमिकेपासून पक्ष कधीही माघार घेणार नाही असे सेनेतील सूत्रांनी सांगितले आहे. याउलट भाजपला आधी लोकसभा निवडणुकीचे बघू मग विधानसभेचे जागावापट करू असे वाटते. जोपर्यंत भाजप मोठ्या भावा संदर्भातील निर्णय घेत नाही तोपर्यंत युती संदर्भात अंतिम निर्णय होणार नाही हे यावरून स्पष्ट होते.

भाजपला हवेत जुने मित्र सोबत

आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी विरोधात विरोधकांनी महाआघाडी तयार केल्याने भाजपला मित्र पक्षांची गरज आहे. यात टीडीपी, एरएलएसपी, आसम गण परिषद NDAतून बाहेर पडलेल्याने भाजपला नवे मित्र शोधावे लागतील. तर, शिवसेनेसारख्या जुन्या पण नाराज असलेल्या 'मित्र' पक्षाची नाराजी दूर करावी लागणार आहे.

VIDEO : आता शेतकऱ्यांवर प्रत्यक्ष पडणार पैशांचा पाऊस; PM मोदी दाबणार बटन
 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 08:07 PM IST

ताज्या बातम्या