कवयित्री नीरजा यांना पितृशोक..ज्येष्ठ समीक्षक म.सु.पाटील यांचं निधन

कवयित्री नीरजा यांना पितृशोक..ज्येष्ठ समीक्षक म.सु.पाटील यांचं निधन

ज्येष्ठ समीक्षक साहित्यिक म.सु. पाटील (मधुकर सु. पाटील) यांचं आज (1 जून) मुलुंड इथे त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. त्यांच्या जाण्याने साहित्यविश्वाची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 1 जून- ज्येष्ठ समीक्षक साहित्यिक म.सु. पाटील (मधुकर सु. पाटील) यांचं आज (1 जून) मुलुंड इथे त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. त्यांच्या जाण्याने साहित्यविश्वाची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. नुकताच साहित्यविश्वात मानाचा समजला जाणारा सन 2018 चा 'साहित्य अकादमी पुरस्कार' त्यांना जानेवारी 2019 ला प्रदान करण्यात आला होता. शनिवारी सकाळी मुलुंड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कवयित्री नीरजा यांचे ते वडील होत.

म.सु. पाटील यांचा जन्म 1931मध्ये रायगडमध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला. नाशिक नाशिक जिल्ह्यातीस मालेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. 1946 ते 1964 या कालावधीत त्यांनी गिरणी कामगार, कारकून आणि शिक्षक म्हणूनही काम केलं. 1969 नंतर ते मनमाडच्या महाविद्यालयात प्राचार्य झाले. तिथल्या त्यांच्या वीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी 'रेल्वेचे जंक्शन' अशी ओळख असलेल्या मनमाडला साहित्याच्या नकाशावर आणलं. महाविद्यालयात अनेक नामवंत कवी, समीक्षकांना आमंत्रित करणे, चर्चासत्रे आयोजित करणे, नाशिक जिल्ह्य़ातील मराठीच्या प्राध्यापकांचे एक अभ्यासमंडळ स्थापन करणे या व अशा अनेक साहित्यविषयक उपक्रमांतून त्यांनी त्या परिसरातील साहित्यप्रेमींमध्ये साहित्यजाण रुजवली. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या 'लांबा उगवे आगरी' या त्यांच्या आत्मकथनातून त्यांचा 'शून्य ते शिखर' हा प्रवास किती खडतर होता, याची आपल्याला कल्पना येते.

मराठी साहित्य समीक्षेच्या प्रांतात अत्यंत आदराचे स्थान असलेले ज्येष्ठ समीक्षक प्रा. म. सु. पाटील यांना सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध या त्यांच्या पुस्तकासाठी या पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.प्रामुख्याने कवितेवरील मर्मग्राही समीक्षा ही म. सु. पाटील यांची ठळक ओळख होती. त्याचबरोबर संत साहित्याचा व्यासंग, दलित साहित्याचा अभ्यास ही देखील त्यांची वैशिष्ट्ये.

तुकाराम-अंतर्बाह्य संघर्षाची अनुभवरूपे, दलित कविता व दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र, प्रभाकर पाध्ये: वाड्मयदर्शन सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध, ज्ञानेश्वरीचा काव्यबंध, ज्ञानेश्वरीचा तृष्णाबंध, बदलते कविसंवेदन ही त्यांची पुस्तके त्यांच्या व्यासंगाची साक्ष देतात. लांबा उगवे आगरीं हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक आहे.

VIDEO: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शहीद जवानांना वाहिली आदरांजली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2019 10:55 AM IST

ताज्या बातम्या