यवतमाळ,ता.15 एप्रिल: यवतमाळ जिल्ह्यात वीज कोसळून आज चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. महागाव तालुक्यातील्या वेणी गावातली ही घटना आहे. दुपारी शेतात काम करत असतांना अचानक अवकाळी पाऊस सुरु झाला, वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट झाला आणि सगळे शेतकरी लिंबाच्या झाडाखाली आश्रयाला आले. मात्र याचवेळी शेतकऱ्यांवर वीज पडून चार जण ठार झाले तर चार शेतकरी जखमी झालेत. जखमींवर महागावच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर दारव्हा तालुक्यातील बोधगव्हान इथे वीज कोसळून 7 शेळ्यांचा मृत्यू झाला.
नांदेड जिल्ह्यात गारपीट
दोन दिवसाच्या विश्रांती नंतर रविवारी पुन्हा अवकाळी पावसाने नांदेड जिल्ह्याला तडाखा दिलाय. हदगाव तालुक्यात पावसासह जोरदार गारपीट झाली. हदगाव शहर आणि तालुक्यातील अनेक गावांना तब्बल अर्धा तास गारांचा मारा बसला. या गारपीटीमुळे फळबागांचं मोठं नुकसान झालं. यावेळी वादळी वा-यामुळे अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला. हदगावसह हिमयतनगर, भोकर तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. लोहा ,कंधार तालुक्यात काही ठिकाणी रिमझीम पाऊस झाला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा