उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतरही युतीचा 'सस्पेन्स' कायम

उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतरही युतीचा 'सस्पेन्स' कायम

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांची मस्ती उतरली, आता महाराष्ट्रातही त्यांना जागा दाखवून द्या.

  • Share this:

पंढरपूर 25 डिसेंबर : निवडणुका जवळ आल्याने महाराष्ट्रात सध्या एकच प्रश्न विचारला जातोय, युती होणार का? या प्रश्नाच्या उत्तरासाठी सर्व देशाचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या पंढरपूरच्या सभेकडे लागलं होतं. या सभेत उद्धव यांनी नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर घणाघात तर केला मात्र युतीचा सस्पेंस कायम ठेवला.


उद्धव म्हणाले, जागावाटप गेलं खड्ड्यात. आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. त्याचं काय करायचं ते नंतर बघू. आम्ही आधी त्याबाबत घोषणा केलेलीच आहे. मात्र युती करायची की नाही याचा निर्णय जनताच घेईल असं सांगत त्यांनी युतीची दारं पूर्ण बंद झाली नाहीत हे दाखवून दिलं. मात्र कडक टीका करत शिवसेनेला गृहित धरू नका हा इशाराही त्यांनी भाजपला दिला.


विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांची मस्ती उतरली असं सांगत त्यांनी भाजपवरचा दबाव वाढवला आणि महाराष्ट्रातही शिवसेनेलाच सत्ता द्या असं आवाहन केलं.


उद्धव ठाकरेंच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

- सर्व जातीपातीच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा देणार


- छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मतदारांनी घाण साफ केली


- अयोध्येनंतर पंढरपुरातही कुंभकर्णाला जागं करायला आलो आहे. राममंदिर बांधल्याशिवाय आम्ही झोपणार नाही


- जानेवारीमध्ये दुष्काळग्रस्त महाराष्ट्राचा दौरा करणार, दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांची दैना आहे


- मिझोरम आणि तेलंगाणामधे प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांना धूळ चारली तर छत्तीसगडमध्ये आदिवासी समाजांनी पर्यायाचा विचार न करता आधी असलेली घाण स्वच्छ केली. अशी सफाई महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांचा पक्ष करेल का?


- काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत जो काही समज भाजपनं निर्माण केला होता तो या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालात वाहून गेला आहे


- हे सगळं मी दुष्काळग्रस्तांसाठी करतो आहे. मी येण्यापूर्वी अनेक शिष्टमंडळांना भेटलो. तिथे धनगर, महादेव कोळी यांना भेटलो. विठोबाच्या साक्षीनं मी धनगर आणि महादेव कोळी समाजाला वचन देतो की, मराठ्यांप्रमाणेच मी त्यांच्याही खांद्याला खांदा लावून उभा राहणार


- या मैदानावर सभा घेण्याचं धाडस कऱत नाही त्यामुळे मी इथेच सभा घेणार, शिवसेनाप्रमुखांचा वारसा घेऊन मी चाललो आहे


- एक महिन्यापूर्वी मी शरयु नदीच्या किनारी होतो आणि आज बरोबर एक महिन्यानंतर चंद्रभागेतिरी आहे


- देशात आज पहारेकरीही चोरी करायला लागले आहे


- दुष्काळाची पाहणी करायला आलेले केंद्रीय पथक पटापट निघून गेले मात्र त्यालाही दोन महिने झाले


- पंतप्रधानांनी पंढरपुरात येऊन केवळ मस्तकाला धूळ लावली तरी त्यांना पुण्य लाभेल.


- शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारकडे काहीही योजना नाही अशी माहितीच सरकारने संसदेत दिली


- वारकरी केवळ पंढरपुराची वारी कऱणारा नाही तर अन्यायावर वार करणारा आहे आम्ही छातीवर वार करतो, पाठीवर नाही


- राफेलखरेदीमध्ये घोटाळा झाला त्यावर अद्याप सरकारनं उत्तर दिलं नाही


- सैन्याच्या पगारवाढीचा प्रस्ताव सरकारनं नाकारला मात्र त्यांच्यासाठी खरेदी केल्या जाणाऱ्या शस्त्रसामुग्रीच्य़ा खरेदीत घोटाळा करता


- शेतकरी म्हणजे मधाचं पोळं आहे, जोवर मध मिळेल तोवर ठीक जेव्हा दगड माराल तेव्हा अंगाची आग करतील


- राफेलप्रमाणेच पीकविमा योजनेतही घोटाळा


- आस्तित्वात नसलेल्या कंपन्या स्थापून घोटाळा केला


- विठोबाच्या चरणी एकच साकडं घातलं - ज्य़ांनी जनतेचं वाकडं केलं त्यांचं तुम्ही वाकडं करा


- शेतकऱ्याचं पीककर्ज माफ होतं का, पीकविम्याची रक्कम मिळते का, पीकाला किंमत मिळते का?


- मी भाजप, एनडीएचा विरोधक नाही. युती करायची की, नाही हे जनता ठरवेल. युतीवर मी आता बोलणार नाही


- राम मंदिरांबद्दल नितिशकुमार आणि रामविलास पासवानांचं काय मत आहे हे स्पष्ट करावं आणि मग भाजपनं सांगावं की, त्यांनी या दोघांपुढे का नमतं घेतलं.
 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 24, 2018 05:31 PM IST

ताज्या बातम्या