News18 Lokmat

उद्धव ठाकरेंनी सांगितलं भाजपसोबत पुन्हा युती करण्यामागचं खरं कारण!

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजप-सेना या दोन्ही पक्षांमध्ये युती झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 20, 2019 07:45 AM IST

उद्धव ठाकरेंनी सांगितलं भाजपसोबत पुन्हा युती करण्यामागचं खरं कारण!

मुंबई, 20 फेब्रुवारी : शिवसेनेनं भाजपसोबतची गेल्या अनेक वर्षांपासून असलेली युती चार वर्षांपूर्वी तोडली. आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांमध्ये युती झाली आहे. त्यानंतर स्वबळाच्या नाऱ्याचं काय झालं? असा सवाल करत शिवसेनेवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना' या मुखपत्रातून आपली भूमिका मांडली आहे.

'शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली नाही. 2014 मध्ये भाजपकडून रीतसर काडीमोड झाला असतानाही पुन्हा एकत्र कसे? नक्की कोणत्या मुद्द्यांवर एकत्र येत आहात? राममंदिर उभे राहील काय? शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल काय? असे अनेक प्रश्न आहेत व त्याची उत्तरे सकारात्मक आहेत. लोकशाहीत व खास करून तुमच्या संसदीय लोकशाहीत ‘आकड्या’ला महत्त्व नको तितके आलेच आहे. त्यामुळे हा आकडा जसा इतर लावतात तसा आम्हालाही लावावा लागतो. युतीच्या नव्या मांडणीत नवी आकडेमोड झाली आहे. त्या आकडेमोडीपेक्षा राज्याची नवी ‘मांडणी’ झाली तर ती आम्हाला हवी आहे,' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

काय आहे सामनाचा अग्रलेख?

'अमित शहा हे स्वतः ‘मातोश्री’ वर आले. आम्हाला जे सांगायचे, बोलायचे ते ‘ठाकरे’ पद्धतीने ठोकून सांगितले. ज्या चुका आधी झाल्या त्या पुन्हा होणार नाहीत यावर किमान एकमत झाले. त्यातून ‘युती’ला आणखी एक संधी देण्याचा निर्णय झाला.'

'महाराष्ट्राच्या हितासाठी जी नवी जुळवाजुळव केली आहे ती घेऊन पुढे जावे यातच सगळ्यांचे हित आहे. जनतेच्या मनात कमी, पण आमच्या राजकीय विरोधकांच्या डोक्यात प्रश्नांचे किडे जरा जास्तच वळवळत आहेत. ‘युती’मुळे हे किडेमकोडे साफ चिरडले जातील या भीतीतून त्यांची वळवळ सुरू झाली आहे.'

Loading...

'2014 या वर्षात काँग्रेस आघाडी सरकारच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष होताच. मोदी यांचा उदय व त्यांचे सादरीकरण लोकांना भिडले व एक लाट काँग्रेस, त्यांच्या बगलबच्च्यांविरोधात निर्माण झाली. मात्र आता त्या लाटेची उंची व तुफान कमी झाले आहे आणि 2019 ची स्थिती ही लाटेवर निवडणुका लढण्याची नसून विचार, काम व भविष्य यावर लढण्याची आहे.'

'भारतीय जनता पक्ष स्वबळावर बहुमताचा आकडा पार करणे आज तरी शक्य नाही याची जाणीव त्यांना दोन वर्षांपूर्वीच झाली आणि एनडीएच्या अडगळीतील भांड्यांना कल्हई करणे हाच मार्ग बरा असे त्यांना वाटले. पण शिवसेना हे अडगळीतले भांडे कधीच नसल्याने सत्य, देशहित व हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आमचे भांडे भांड्यास लागून वाजत राहिले व खणखणीत नाणे गाजत राहिले. दबाव आणि मुस्कटदाबी ही भुते आम्ही शिवसेनेच्या मानगुटीवर कधीच बसू दिली नाहीत. आम्ही आमचा बाणा जपला, जपत राहू. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली नाही.'

'2014 मध्ये भाजपकडून रीतसर काडीमोड झाला असतानाही पुन्हा एकत्र कसे? नक्की कोणत्या मुद्द्यांवर एकत्र येत आहात? राममंदिर उभे राहील काय? शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल काय? असे अनेक प्रश्न आहेत व त्याची उत्तरे सकारात्मक आहेत.'

'आमच्या पाठीत वार झाले व ते स्वकीयांनीच केले. इतिहासात हे वारंवार घडले. मग ते शिवराय असतील नाहीतर शिवसेनाप्रमुख. पाठीवरचे वार सहन करून व प्रसंगी सांडलेल्या रक्ताची किंमत मोजून त्यांनी संघटन पुढे नेले. ही माघारही नसते व लाचारीदेखील नसते, तडजोड तर नाहीच नाही. देशातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते उद्याच कळेल, पण ‘वारे’ आमच्या बाजूला वळले. वारा येईल तशी आम्ही पाठ फिरवली नाही याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल. तूर्त इतकेच पुरे! तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार ‘म्यानबंद’ नाही.'


VIDEO : सगळी प्रकरणं बाहेर काढेन, नारायण राणे आणि राऊतांमध्ये खडाजंगी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 20, 2019 07:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...