आत्महत्या थांबेनात...नापिकी- दुष्काळ- कर्जबाजारीपणामुळे 3 शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले

एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या, यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तरी देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबता थांबेना. दुसरीकडे, नापिकी, दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाच्या नैराश्यातून मृत्यूला कवटाळऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 27, 2019 04:49 PM IST

आत्महत्या थांबेनात...नापिकी- दुष्काळ- कर्जबाजारीपणामुळे 3 शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले

बब्बू शेख (प्रतिनिधी)

मनमाड, 27 एप्रिल- एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या, यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तरी देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या  थांबता थांबेना. दुसरीकडे, नापिकी, दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाच्या नैराश्यातून मृत्यूला कवटाळऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या दोन दिवसांत मालेगाव व नांदगाव तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी 3 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. गेल्या चार महिन्यांत नाशिक जिल्ह्यातील 28 शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपविले आहे.

आत्महत्त्येची पहिली घटना मालेगाव तालुक्यातील वडगाव येथे घडली. प्रकाश विठ्ठल ठोके या शेतकऱ्याने राहत्या घरी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्याकडे दोन एकर शेतजमीन आहे. मात्र, काही वर्षांपासून दुष्काळ, नापिकीमुळे उत्पन्न मिळाले नाही. त्यात शेतीसाठी त्यांनी स्थानिक सोसायटीकडून कर्ज घेतले होते. सोसायटीचे व वैयक्तिक घेतलेले असे एकूण तीन लाख रुपये कर्ज त्यांच्यावर होते. कुटुंबातील अन्य सदस्य लग्न समारंभासाठी बाहेर गेलेले असताना संधी साधून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर तलाठी चंद्रकांत महाले यांनी पंचनामा करून प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे.

आत्महत्येच्या दोन घटना नांदगाव तालुक्यात घडल्या आहेत. मूळ डोंगरी येथील रतन पूना चव्हाण गळफास घेऊन आत्महत्या केली. चव्हाण यांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून होता. त्यांच्यावर विकास सोसायटीचे कर्ज होते. दुष्काळी परिस्थिती आणि कर्जबाजारीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

दुसरी घटना तालुक्यातील साकोरे येथे घडली आहे. दत्तू एकनाथ बोरसे या शेतकऱ्याने नाशिकच्या दिशेने जाणाच्या महानगरी एक्स्प्रेसखाली उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या डोक्यावर सोसायटीसह हात उसनवार व सोने तारण असे मिळून 4 लाख रुपयांचे कर्ज होते. बोरसे यांच्या नावावर चार एकर जमीन आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Loading...

नाशिक विभागात 2014 ते 2018 या पाच वर्षांच्या कालावधीत तब्बल 2155 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यापैकी 1094 आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबांनाशासनातर्फे आर्थिक मदत मिळाली आहे, तर 1008 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनातर्फे अपात्र ठरविण्यात आले आहेत. याशिवाय 53 आत्महत्याग्रस्त शेतकरी प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचा आलेख दरवर्षी वाढणारा असल्याने शासनाने या समस्येची दखल घेऊन आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे.


पाण्यासाठी जीवाची बाजी, दुष्काळाचं भयाण वास्तव दाखवणारा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2019 04:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...