मुंबई, 28 जून- मुंबईसह उपनगरात गुरुवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पहिल्याच पावसाने तिघांचा बळी घेतला आहे. अंधेरी परिसरातील 60 वर्षीय महिलेसह गोरेगाव परिसरातील दोघांचा मृतांमध्ये समावेश आहे. शॉक लागून या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. काशिमा युडीयार (वय-60, रा. अंधेरी), राजेंद्र यादव (वय-60), संजय यादव (वय-24, दोघेही रा. गोरेगाव पूर्व) अशी मृतांची नावे आहेत. तर शॉक लागून दोघे जखमी झाले आहेत.
दादरमध्ये भिंत पडून 3 जखमी..
दादरमध्ये अंगावर भिंत पडून 3 जण जखमी झाले आहेत.दिनकर तोडवले (वय-35), विजय नागर (वय-35) व चेतन ताठे (वय-28) अशी जखमींची नावे आहे. जखमींना केईम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, मुंबईसह राज्यभर पावसाची वाट पाहिली जात असताना मध्यरात्रीपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने जोरदीर हजेरी लावली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, कोकण या भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. शिवाय, देशाच्या अन्य राज्यांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओडिसा, झारखंड आणि बिहारमध्ये 2 जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन हे काही दिवस लांबलं. अद्याप मान्सून सर्व देशात देखील सक्रीय झालेला नाही. पण, राज्यात मात्र मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात मान्सून उशिराने दाखल होण्यास वायू चक्रीवादळ देखील कारणीभूत ठरले आहे. पुढील 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबईकरांच्या चेहऱ्यावर समाधान..पण,
ठाणे, मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चेहऱ्यावर समाधान देखील दिसत आहे. पण, पहिल्याच पावसात मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागला. शिवाय, लोकल सेवेवर देखील पावसाचा परिणाम झाला. त्यामुळे 30 ते 35 मिनिटे लोकल उशिराने धावत आहेत. मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरांमधील काही भागांमध्ये पाणी साचल्याचं देखील चित्र पाहायाला मिळत आहे.
VIDEO: मुसळधार पावसानं प्लॅटफॉर्मवरच आला धबधबा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा