17 सप्टेंबर: वर्षाहून अधिक काळ लोटून गेला असला तरी कोपर्डी गावात बलात्कार करणाऱ्या नराधमांना अजून शिक्षा झालेली नाही. आता याच खटल्याच्या सुनावणीला विलंब होत असल्याची कबुली या खटल्यातले सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे.
13 जुलै 2016ला कोपर्डीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध करण्यात आला होता. या खटल्याचं कामकाज फास्टट्रॅक कोर्टात चालवून हा खटला सहा महिन्यात निकाली काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. हा खटला दाखल होऊन या १३ सप्टेंबरला चौदा महिने पूर्ण झाले तरीही खटल्याचं कामकाज अजून सुरूच आहे. प्रश्नांवर अॅडव्होकेट निकम यांनी खटल्याच्या सुनावणीला विलंब होत असल्याची कबुली माध्यमांशी बोलताना दिलीय . मात्र या विलंबाचे खापर त्यांनी अप्रत्यक्ष आरोपींच्या वकिलावर फोडले आहे. अशा संवेदनशील खटल्याचे ऑडीट करण्याचा आग्रह त्यांनी केला आहे.'ज्यांच्यामुळे उशीर होतो त्यांच्यावर कायदेशीर दृष्ट्या कारवाई व्हायला हवी अन त्यासाठी कायद्यात तरतूद करायला हवी'असंही ते म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा