मुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली

राज्य सरकारच्या वतीनं गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरात वृक्षलागवड मोहीम राबवण्यात येतेय. याच मोहिमेंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी १ जुलै रोजी वरप गावाच्या डोंगराळ भागात वृक्षलागवड केली होती

News18 Lokmat | Updated On: Nov 15, 2018 10:33 PM IST

मुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळालीगणेश गायकवाड, प्रतिनिधी


उल्हासनगर, 15 नोव्हेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत लावलेली झाडं वणव्यात जळून खाक झाल्याची घटना उल्हासनगरमधील वरप गावात घडली आहे.याप्रकरणी वनविभागानं पाच जणांना अटक केली आहे.

Loading...


राज्य सरकारच्या वतीनं गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरात वृक्षलागवड मोहीम राबवण्यात येतेय. याच मोहिमेंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी १ जुलै रोजी वरप गावाच्या डोंगराळ भागात वृक्षलागवड केली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात वानवा पेटण्याचे प्रकार सुरू झाले होते. त्यात वृक्षलागवड मोहिमेंतर्गत लावण्यात आलेली शेकडो झाडं जळून खाक झाली आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या हाताने लावलेलं झाड सुरक्षित असलं, तरी इतर झाडांना मात्र वणव्याची मोठी झळ बसली आहे.


एकीकडे ही आग विझवण्याचं जिकिरीचं काम सुरू असतानाच हे वणवे पेटवणाऱ्यांचा वनविभागाकडून गेल्या दोन दिवसांपासून कसून शोध सुरू होता. त्यात बुधवारी वरप परिसरातच पाच जण वनविभागाच्या हाती लागले. हे पाचही जण मूळचे अकोला जिल्ह्यातले असून शेणाच्या गोवऱ्या तयार करण्याचं काम करतात. सपाट जमीन तयार करण्यासाठी गवत जाळत असताना ही आग पसरून वणवा लागल्याचं या पाच जणांचं म्हणणं आहे.


मात्र, या आगीमुळे वनसंपदेचं नुकसान झाल्याचं कारण देत वनविभागाने त्यांना वनसंरक्षण कायद्यानुसार अटक केली आहे. दरम्यान, मागील वर्षी अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ गावात खासदार श्रीकांत शिंदेंनी लावलेल्या झाडांनाही अशाच प्रकारे आग लावण्यात आली होती.

==================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2018 10:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...