मराठा मोर्चामुळे स्थळं यायला लागली पण..,'रणरागिणीं'चा खुलासा

"मीच डॅशिंग असल्यामुळे मलाही डॅशिंग नवरा हवाय, असला घाबरट साथीदार नकोय"

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 9, 2017 10:27 PM IST

मराठा मोर्चामुळे स्थळं यायला लागली पण..,'रणरागिणीं'चा खुलासा

09 आॅगस्ट : मराठा क्रांती मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी पडद्यामागे अनेक चेहरे काम करतात. त्यापैकी एक नाव म्हणजे अक्का अर्थात बीडच्या स्वाती नखाते...आयबीएन लोकमतच्या न्यूजरूम चर्चा या कार्यक्रमात मराठा मोर्चानंतर आपल्याला किती स्थळं आली याचा जाहीर खुलासाच स्वाती नखाते यांनी आपल्या स्टाईलने केला. एवढंच नाहीतर आपला साथीदार हा आपल्यासारखाच डॅशिंग हवाय असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

मुंबईत मराठा क्रांती मोर्चा यशस्वीपणे पार पडल्यानंतर मराठा मोर्च्याच्या पाच 'रणरागिणी' ज्या मोर्च्याच्या अग्रस्थानी असतात त्या आयबीएन लोकमतमध्ये पोहोचल्या. 'न्यूजरूम चर्चा' या कार्यक्रमात आयबीएन लोकमतचे  संपादक प्रसाद काथे यांनी सडेतोड मुलाखत घेतली. या मुलाखतीत पाचही रणरागिणींनी सडेतोड उत्तर देऊन मराठा मोर्चाबद्दल आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. अशाच एका प्रश्नावर मराठा मोर्च्यामुळे व्यक्तिगत आयुष्य कसं बदललं ?, इतके मोर्चे केले तर स्थळं यायला लागली का ?, असा थेट सवाल केला असता स्वाती नखाते यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं.

स्वाती नखाते म्हणाल्या, "मी जेव्हा 25 वर्षांची झाली होती तेव्हा मला स्थळ येण्यास सुरुवात झाली. मी आधीच मनाशी पक्क केलं की हुंडा देणार नाही आणि व्यसनी मुलाशी लग्न करणार नाही. भलेही तो बेरोजगार असला तरी चालेल, नंतर काही उद्योगधंदा सुरू करता येईल. मी जेव्हा ही भूमिका मांडली तेव्हा मला घरच्यांनी विरोध केला. एक स्थळ तर असं आलं की 21 लाख हुंडा द्यायचा असं माझ्या चुलत्यांनीच ठरवलं. बरं 21 लाख तर द्यायला तर नाहीयेच. मग काय वडिलांनी किडन्या विकून पैसे गोळा करायचे का ? पोरीचा संसार थाटण्यासाठी बापाने भिकारी व्हायचं हे मला अजिबात मान्य नाही असा अनुभव नखाते यांनी सांगितला.

पण जेव्हा मी मराठा मूक मोर्च्याचा कामाला सुरुवात केली तेव्हा लोकांना माहिती होतं मी हुंडाविरोधी मोहिमेसाठी काम करते. तरी सुद्धा चालून स्थळं येतात. तुम्ही म्हणाल तिथे हवं तितकं सोनं देण्याची मागणी घालतात. मीच डॅशिंग असल्यामुळे मलाही डॅशिंग नवरा हवाय, असला घाबरट साथीदार नकोय. मी मराठा समाजासाठी काम करते. मला माझं काम करू देणार साथीदार हवाय. माझं पहिलं प्रेम हे माझं काम आहे नंतर साथीदार असेल असंही नखाते यांनी ठणकावून सांगितलं.

तर दुसरी 'पोस्टर गर्ल' यवतमाळची वैष्णवी डाफ हीनेही आपला असाच काहीसा अनुभव सांगितला. "वर्ध्यात मी पहिल्यांदाच मोर्च्यात सहभागी झाले. वैष्णवी डाफ यवतमाळ माझं तिथे भाषण आक्रमक झालं. त्या मोर्चाच माझा एक आक्रमक फोटो निघाला. आणि त्यानंतर विदर्भात प्रत्येक मोर्च्याच्या बॅनरवर माझा फोटो झळकला. त्यानंतर जिथे कुठे गेले तिथे पोस्टर गर्ल म्हणून मला ओळखलं जाऊ लागलं असा अनुभव वैष्णवी डाफ यांनी शेअर केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2017 10:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...