पुण्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने कलमाडींची भाजपशी जवळीक !

पुण्याच्या गणेशोत्सव मिरवणुकीतील माजी खासदार सुरेश कलमाडींची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावून गेलीय. विशेष म्हणजे कलमाडींनी भाजपचे शहरातील पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासोबतीने भाजप पदाधिकाऱ्यांसोबत नाष्टाही घेतला. त्यामुळे कलमाडी भाजपच्या जवळ तर जात नाहीत अशा स्वरुपाच्या राजकीय चर्चांना उधान आलंय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 5, 2017 05:27 PM IST

पुण्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने कलमाडींची भाजपशी जवळीक !

पुणे, 5 सप्टेंबर : पुण्याच्या गणेशोत्सव मिरवणुकीतील माजी खासदार सुरेश कलमाडींची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावून गेलीय. विशेष म्हणजे कलमाडींनी भाजपचे शहरातील पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासोबतीने भाजप पदाधिकाऱ्यांसोबत नाष्टाही घेतला. त्यामुळे कलमाडी भाजपच्या जवळ तर जात नाहीत अशा स्वरुपाच्या राजकीय चर्चांना उधान आलंय. कलमाडींनीही बऱ्याच वर्षांनंतर गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होता आल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय.

खरंतर पुणे फेस्टिवल ही सुरेश कलमाडीं चीच संकल्पना आहे. पण राष्ट्रकुल घोटाळ्यात अडकल्यापासून कलमाडी राजकारणातून काहिसे बाजुला पडले होते. काँग्रेसनेही त्यांना निलंबित केल्याने त्यांनी शांत राहणंच पसंत केलं. आणि पुण्यात काँग्रेसची वाताहात होऊन महापालिकेतही भाजपची सत्ता आली. अशातच मध्यंतरी कलमाडींनी पुणे मनपातील भाजपच्या कारभारावर आपण समाधानी असल्याचं विधान केल्यानं वेगळ्या राजकीय चर्चांना नव्याने तोंड फुटलं. याच दरम्यानच्या काळात विश्वजीत कदमांनी पुणे काँग्रेस बुडवल्याची एक बेनामी पोस्टर शहरात झळकलं. त्यावर या राजकीय षडयंत्रामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप काँग्रेसवाल्यांनी केला. पण पक्षाची जी मानहाणी व्हायची ती झालीच, अशातच सुरेश कलमाडीही भाजपचे गोडवे गात त्यांच्यातच मिसळू लागल्याने पुण्याच्या राजकारणात नवी समीकरणं जुळवून तर येत नाहीत ना, अशा चर्चा नव्याने झडू लागल्यात.

तसंही बांधकाम व्यावसायिक कम राज्यसभा खासदार संजय काकडे पालकमंत्री बापटांना भाजपात नकोसे झालेत. त्यामुळे काकडेंना राजकीय शह देण्यासाठी तर बापट गटाकडून कलमाडींना पुन्हा राजकारणात सक्रिय केलं जात नाही ना अशी, शंका यायला बराच वाव आहे. कारण कितीही नाही म्हटलं तरी कलमाडींना माननारा एक मोठा राजकीय गट आजही पुण्याच्या राजकारणात टिकून आहे. नाही म्हणायला तो सध्या काहिसा विखुरलेला असेलही पण खरंच कलमाडी पुन्हा राजकारणात सक्रिय झाले तर शहराच्या राजकारणाची समीकरणं ते नक्कीच इकडून तिकडे फिरवू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2017 05:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...