...म्हणून 'अवनी'ला ठार मारलं-सुधीर मुनगंटीवार

...म्हणून 'अवनी'ला ठार मारलं-सुधीर मुनगंटीवार

"वन विभागाने अतिशय संवेदनशीलतेने हे प्रकरण सांभाळलं. मुळात वन कर्मचारी हे वन्य प्राण्यांचे शत्रू असू शकत नाही"

  • Share this:

प्रशांत बाग, प्रतिनिधी


नाशिक, 05 नोव्हेंबर : अवनी, अर्थात टी-1 वाघिणीला ठार मारल्यामुळे वन खात्यावर चौफेर टीका होत आहे. अवनी वाघिणीच्या शिकारीवरुन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडायला सुरूवात झाली आहे. आज सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अवनी वाघिणीला नाईलाजाने ठार मारावे लागले असं स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच सोशल मीडियातून टी 1 वाघिणीबद्दल हीन दर्जाची टीका केली जात आहे त्यामुळे वन विभागातील कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे असंही मुनगंटीवार म्हणाले.


१३ जणांना ठार मारण्याच्या आरोपावरून अवनी या टी-१ वाघिणीला शुक्रवारी रात्री ठार मारण्यात आलं. अवनीला ठार मारल्यानंतर वन्यप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केलाय. तसंच केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनीही राज्य सरकारवर अवनीच्या हत्येचा आरोप केला. त्यामुळे आज नाशिकमध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अवनी वाघिणीला ठार मारण्याबद्दल स्पष्टीकरण दिलंय.


सुप्रीम कोर्टाने अवनी वाघिणीला ठार मारण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वनविभागाने कारवाई सुरू केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून अवनी वाघिणीचा शोध घेतला जात होता. परवा एका गावकऱ्याने टी-१ वाघीण दिसल्याची माहिती दिली आणि शोध मोहीम सुरू झाली. ट्रॅक्युलाझ केल्यानंतर वाघीण लगेच गुंगीत जात नाही कारण डोस कमी द्यावा लागतो. अशात वाघिणीने जिप्सीवर हल्ला केला आणि नाईलाजाने तिला ठार करावं लागलं असं मुनगंटीवार म्हणाले.


'वनविभाग प्राण्यांचे शत्रू नाही'


वन विभागाने अतिशय संवेदनशीलतेने हे प्रकरण सांभाळलं. मुळात वन कर्मचारी हे वन्य प्राण्यांचे शत्रू असू शकत नाही. वन आणि वन प्राण्यांचे संरक्षण करण्याचं सर्वात मोठं काम आमच्या सरकारने केले आहे. महानायक अमिताभ बच्चन यांना वाघांच्या संवर्धनाचे ब्रँड अॅम्बेसेडर करणारं हे राज्य आहे असंही मुनगंटीवार म्हणाले.


मनेका गांधींनी माझ्यावर तीन वाघांना मारण्याचे आदेश दिल्याचे आरोप करतायत पण 1995, 2006, 2013 आणि ऑगस्ट 2014 ला वाघाला मारण्याचे आदेश देण्यात आले त्यावेळीस मी मंत्री नव्हतो, त्यांनी जर एक ५० पैसे घालवून फोन केला असता तर अवनीबद्दलची सगळी माहिती दिली असती असा पलटवारही मुनगंटीवार यांनी केला.


'मनेका गांधींच्या मतदारसंघात शाहफतने वाघाला ठार मारले'


शाहफत अली खान हा कोण आहे हे मला माहिती नाही. अनेक राज्यांनी त्याला प्राण्यांना मारण्यासाठी नियुक्त केले आहे. T1 वाघिणीला मारतांना शाहफत अली खान बिहारमध्ये एका बैठकीत उपस्थित होता.

शाहफत अली खान यांचा मुलाला वन विभागाने या कारवाईसाठी अधिकृत नियुक्त केले होते असं मुनगंटीवार यांनी सांगितलं. तसंच याच शाहफत अली खान यांनी मनेका गांधी खासदार असलेल्या पिलीभीतमध्ये एका वाघाला मारले आणि त्याचे अभिनंदन करणारे पत्र पीसीसीएफने पाठवले होते असा दावाही मुनगंटीवार यांनी केला.


अज्ञानातून सोशल मीडियावर गदारोळ


सोशल मीडियातून टी 1 वाघिणीबद्दल हीन दर्जाची टीका केली जात आहे. त्यामुळे वन विभागातील कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे. अफवा पसरवणारे सोशल मीडियाचe चुकीच्या पद्धतीने वापर करत आहे अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली.


'२५ वाघांची संख्या वाढली'


मी वन मंत्री झाल्यापासून 25 वाघांची संख्या वाढली हे मी त्यांना पत्राद्वारे कळवणार आहे. उत्तम काम करत असतांना असे भाष्य केल्याचा मला खेद वाटतोय. कृपया चांगल्या कामाला नजर लागेल असे प्रयत्न कोणी करू नये अशी माझी विनंती आहे असंही मुनगंटीवार यांनी म्हटलंय. याबाबत कुठल्याही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी 1926 टोल फ्री नंबर सुरू करतोय अशी घोषणाही मुनगंटीवार यांनी केली.


अशी झाली अवनीला ठार मारण्याची कारवाई


यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावच्या जंगल परिसरात 13 लोकांचा जीव घेणाऱ्या टी-1 अर्थात अवनी या नरभक्षक वाघिणीला वनविभागाच्या रेस्क्यू टीमनं ठार केलं. टी वन वाघिणीला ठार मारल्यानंतर नागपूरला तिचे शवविच्छेदन करण्यात आले आणि त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार केले गेले.


शुक्रवारी रात्री शोध सुरू असताना ती शोध पथकाला दिसली. दिसताक्षणी तिला वन विभागाच्या पथकाने तिलं जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी तिनं पथकाच्या दिशेनं चाल केली. पण दिसताच शार्प शूटर अजगर अलीनं तिच्यावर गोळ्या झाडल्या आणि यात तिचा जागीच मृत्यू झाला. टी-1 वाघिणीला दोन बछडे असून, त्यांचं वय 11 महिने इतकं असून, आता त्यांना शोधण्याचं आव्हान वन विभागासमोर आहे.


न्यूज18 लोकमतशी बोलतांना नागपूर वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा म्हणाले की, ''याआधी याच भागात अवनी दिसत होती म्हणून इथे हे पथक फिरत होतं. नजरेस पडताच ती अवनी असल्याची खात्री झाल्यावर पथकातील वनकर्मचारी शेख यांनी तिला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला. पण अवनीनं वन विभागाच्या ओपन जिप्सीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा असगर अली यांनी तिच्यावर 8 ते 10 मीटर अंतरावरून गोळ्या झाडल्या. यात अवनी जागीच ठार झाली. याच भागात 29 ऑगस्ट रोजी वाघाचा हल्ला झाला होता. हा हल्ला धरून इथे तीन हल्ले झाले आहेत.''


वन्यप्रेमींनी व्यक्त केला संताप


अवनीला ठार मारणं म्हणजे थंड डोक्यानं योजनबद्धरित्या तिचा केलेला खून आहे, असा थेट आरोप वन्यजीवप्रेमींनी केला आहे. वनविभागाने या ऑपरेशनबद्दल अजिबात पारदर्शकता ठेवली नाही, कोट्यवधी रुपये वाया गेले, असाही आरोप वन्यप्रेमींनी केला आहे. तर शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच यातील उणीवा सर्वांसमोर येतील, पण या मोहिमेसंदर्भातली सर्व माहिती पुढे यावी यासाठी फॉरेंसिक अहवालसुद्धा मागवावा, अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे.


======================

अवनीचे अखेरचे 'PHOTO' पाहिल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही!
 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2018 06:08 PM IST

ताज्या बातम्या