S M L

दूध भुकटी बनवणाऱ्या प्रकल्पांना प्रतिलिटर 3 रुपये अनुदान

मार्च 2018 अखेर रोजी 26 हजार 506.70 मेट्रिक टन इतका दूध भुकटी साठा शिल्लक आहे.

Sachin Salve | Updated On: May 8, 2018 06:59 PM IST

दूध भुकटी बनवणाऱ्या प्रकल्पांना प्रतिलिटर 3 रुपये अनुदान

मुंबई, ८ मे : दूध उत्पादकांना योग्य दर देता यावा यासाठी सहकारी आणि खासगी दूध भुकटी प्रकल्पधारकांना दूध भुकटी उत्पादित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दुधाला प्रतिलिटर 3 रुपये अनुदान देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिली.

राज्यात सध्या अतिरिक्त दुधाचे उत्पादन झालेले आहे. याच काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय  बाजारात दूध भुकटीचे दरही घसरलेले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरलेल्या दूध भुकटीच्या दरामुळे दूध भुकटी प्रकल्पधारकांचा कल कमी दूध भुकटी तयार करण्याकडे असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत दूध भुकटी प्रकल्पधारक दूध भुकटी निर्मितीकरिता शेतकऱ्यांकडून कमी दराने दूध खरेदी करतात. याचा थेट परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होतो असं यावेळी जानकर म्हणाले.

मार्च 2018 अखेर रोजी 26 हजार 506.70 मेट्रिक टन इतका दूध भुकटी साठा शिल्लक आहे. या परिस्थितीचा प्रतिकूल परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होऊ नये यासाठी दूध भुकटी प्रकल्पधारकांना अधिक दूध भुकटी उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी आज मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यानुसार शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील 30 दिवसांच्या कालावधीमध्ये मार्च 2018 मध्ये उत्पादित केलेल्या दूध भुकटीपेक्षा किमान 20 टक्के अधिक दूध भुकटीचे उत्पादन करणाऱ्या सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पधारकांना दूध भुकटी बनविण्याकरिता वापरलेल्या दुधासाठी प्रति लिटर 3 रुपये इतके प्रोत्साहनपर अनुदान देण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दूध भुकटी प्रकल्पधारकांना प्रति लिटर दूध रुपांतरणासाठी 3 रुपये इतके अनुदान दिल्यास खाजगी आणि सहकारी दूध उत्पादकांमार्फत सद्यस्थितीत रुपांतरित करण्यात येणाऱ्या प्रती दिन अंदाजे 36 लाख 41 हजार लिटर दुधासाठी 1 कोटी 9 लाख 23 हजार रुपये इतके अनुदान दररोज शासनाकडून दिले जाणार आहे. संपूर्ण 30 दिवसाचा कालावधी लक्षात घेता, अंदाजे 32 कोटी  76 लाख रुपये शासनामार्फत प्रोत्साहनपर अनुदान म्हणून दिले जाणार आहेत.

दूध भुकटी प्रकल्पधारकांना मार्च,2018 मध्ये त्यांनी उत्पादित केलेल्या दूध भुकटीपेक्षा किमान 20 टक्के अधिक दूध भुकटीचे उत्पादन केल्यावर याचा थेट परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या दूध खरेदीवर होणार असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचारही या निर्णयामागे असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 8, 2018 06:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close