प्रवीण मुधोळकर, नागपूर
29 एप्रिल : आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ समजला जाणारा जय वाघ बेपत्ता होऊन वर्ष झालं तरी अद्याप त्याचा शोध वनविभागाला घेता आलेला नाही. गेल्या वर्षभरात जय संदर्भात कुठलेही पुरावे सापडले नसल्याने जयची शिकार झाली असावी किंवा त्याचा मृत्यू झाला असावा या अंदाजापर्यंत व्याघ्रप्रेमी पोहचले आहेत.
जय वाघाचं काय झालं? हा सवाल प्रत्येकजण विचारतोय. या प्रश्नाचं उत्तर ना वनखात्याला द्यायचंय ना सरकारला...जयच्या अस्तित्वाबाबत कोणीही काहीही बोलण्यास तयार नाही. जयचा बछडा श्रीनिवास याची हत्या झाली. पण बेपत्ता झालेल्या जयचं काय झालं हे सांगण्यास कोणीही तयार नाही.
उमरेडच्या अभयारण्यात राहणाऱ्या जयच्या कुटुंबाची वाताहत झाली. त्याच्या कुटुंबातल्या अनेक वाघांनी स्थलांतर केलं किंवा ते बेपत्ता झालेत. याचा परिणाम तिथल्या पर्यटनावरही झालाय.
जयच्या बेपत्ता होण्याची दखल पंतप्रधानांनी घेतली त्यावेळी जयचा शोध लागेल असं वाटलं होतं. पण जयच्या शोधाची फक्त सोंगं काढण्यात आली.
देशातले वाघ असुरक्षित आहेत. गेल्या चार महिन्यात देशात 32 वाघांचा मृत्यू झाला. बेपत्ता झालेल्यांची गणनाच नाही. सरकारच्या कामाची पद्धत अशीच राहिली तर वाघांचं भवितव्य निश्चितच धोक्यात आहे हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज लागणार नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा