किल्ले रायगडच्या विकासासाठी प्राधिकरणाची स्थापना

किल्ले रायगडच्या विकासासाठी प्राधिकरणाची स्थापना

किल्ले रायगडचा विकास करण्यासाठी राज्य सरकारनं रायगड प्राधिकरणाची स्थापना केली आहे. या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची निवड करण्यात आली आहे.

  • Share this:

20 डिसेंबर:  हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडचा विकास करण्यासाठी राज्य सरकारनं रायगड प्राधिकरणाची स्थापना केली आहे. या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची निवड करण्यात आली आहे. किल्ले रायगडसाठी राज्य सरकारचा 600 कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये ही घोषणा केली असून त्याबाबतचं पत्र खासदार संभाजी राजे यांना देण्यात आलंय.  याचे प्रत्यक्ष कामही लवकरच सुरू केलं जाणार आहे. याच रायगडावर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास संभाजीराजे यांनी सुरुवात केली होती , त्यामुळे त्यांच्याच नेतृत्वाखाली आता किल्ले रायगडाचा विकास होणार आहे. संभाजी राजे यांच्यासह कोल्हापूरमधील ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ जयसिंगराव पवार आणि दुर्ग अभ्यासक भगवान चिले यांचाही या प्राधिकरणामध्ये समावेश करण्यात आला आहे.

तसंच रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी , कोकण आयुक्त जगदिश पाटील , माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे , रघुजी आंग्रे , राम यादव, सुधीर थोरात यांचाही या रायगडाच्या प्राधिकरणामध्ये समावेश करण्यात आला आहे.

शिवाजी महाराजांचे अरबी समाजात आणि इतरत्र पुतळे उभारले जातात पण त्यांच्या किल्ल्यांची मात्र डागडुजी केली जात नाही असा आरोप सगळीकडून सरकारवर होत होता.  आता रायगडच्या विकासाला मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिली आहे.तसंच बाकीच्या किल्ल्यांची दुरूस्ती होते का हे पाहणं महत्त्वाचं  ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2017 10:23 AM IST

ताज्या बातम्या